पंचवटीत पोलिसांचा हवेत गोळीबार
By Admin | Updated: February 24, 2017 01:52 IST2017-02-24T01:52:27+5:302017-02-24T01:52:43+5:30
मतमोजणीनंतर पडसाद : मतदानप्रक्रियेवर आक्षेप; दगडफेक आणि लाठीमार; सहा पोलीस कर्मचारी जखमी

पंचवटीत पोलिसांचा हवेत गोळीबार
नाशिक : महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होवून भाजपाने बहुमताकडे वाटचाल सुरू केली असतानाच, आमदार बाळासाहेब सानप यांचा पुत्र उमेदवारी करीत असलेल्या पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या मतदानापेक्षा अधिक मतमोजणी झाल्याच्या संशयावरून तणाव निर्माण झाला. परिणामी जमाव संतप्त होत मतमोजणी केंद्रावर चालून येत तुफान दगडफेक करीत असल्याचे पाहून पोलिसांनी अगोदर लाठीमार व नंतर हवेत गोळीबार केल्याने तणावात आणखी भर पडली.
रात्री ८ वाजेच्या दरम्यान पंचवटीतील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियममधील मतमोजणी केंद्रात घडला. प्रभाग क्रमांक तीनमधील मतमोजणी सुरू असताना भाजपाचे चारही उमेदवार पहिल्या व दुसऱ्या फेरीत पुढे असल्याचे पाहून सेनेचे उमेदवार मोगरे यांच्या मतदान प्रतिनिधींनी मतमोजणीला आक्षेप घेतला व मतदान कमी झाले असताना त्यात वाढ कशी झाली याचा जाब अगोदर मतमोजणी कर्मचाऱ्यांना विचारून मतमोजणी बंद पाडली. भाजपाने मतदान यंत्रात घोळ केल्याची अफवा झपाट्याने पसरल्यामुळे या ठिकाणी हजारोंचा जमाव जमला, तर त्याचवेळी भाजपाचे कार्यकर्तेही समोरासमोर आल्यामुळे तणाव निर्माण होऊन त्यांनी एकमेकांवर चाल केली. जमावाने थेट मतमोजणी केंद्रावर दगडफेक सुरू केली, त्यामुळे मतमोजणी केंद्रांचे दरवाजे बंद करून घेण्यात आल्यावर बाहेर उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करण्यात येऊन त्यांची नासधूस केली. पोलिसांनी जमावाला काबूत आणण्यासाठी प्रारंभी लाठीमार केला, परंतु जमाव पांगण्याऐवजी आणखी चवताळल्याने त्यांनी पोलिसांवरही दगडफेक सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांनी हवेत चार राउंड फायर केले. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला तसेच आमदार बाळासाहेब सानप यांनीही घटनास्थळी भेट दिली.
दगडफेक अन पोलिसांवर चाल
हिरावाडी परिसरातील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये मतमोजणी सुरू होती. यावेळी प्रभाग तीनच्या मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप शिवसेना व अन्य काही पक्षांच्या उमेदवारांनी केला. चारही जागांवर भाजपाच्या उमेदवारांना आघाडी मिळाल्याने मतमोजणीमध्ये फेरफार झाल्याच्या संशयावरु न अन्य राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र आले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी जमावाने पोलिसांच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यास सुरूवात केली.
भाजप-सेनामध्ये भिडत
प्रभाग तीनमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याने शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते आपापसांत भिडले. उमेदवार आमनेसामने आले. अन्य उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसह भाजपाचे कार्यकर्ते आपापसांत भिडले. आमदार बाळासाहेब सानप हे भाजपाचे शहराध्यक्ष असून, त्यांचा हा मतदारसंघ असलेला परिसर आहे.
क्युआरटीचा जवान जखमी
हिंसक जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यावेळी जमावामधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्यामुळे जलद कृती दलाचा (क्युआरटी) जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला उपचारार्थ झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल केले आहे.