फ्लॅट बळकावणाऱ्या महिलेवर पोलिसांत गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 6, 2015 01:19 IST2015-05-06T01:18:10+5:302015-05-06T01:19:02+5:30
फ्लॅट बळकावणाऱ्या महिलेवर पोलिसांत गुन्हा दाखल

फ्लॅट बळकावणाऱ्या महिलेवर पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक : राहण्याची व्यवस्था नसल्याचे कारण सांगून जेलरोडच्या भीमनगर येथील योगेश्वर अपार्टमेंटमध्ये तात्पुरता घेतलेल्या फ्लॅट खाली करून न देता याउलट खोटा साठेखत करारनामा करून तो बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या मुलीवर उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यासंदर्भात फ्लॅटमालकाने पोलीस आयुक्तांकडे दादही मागितली होती़ दरम्यान, या दोघी मायलेकींना अद्याप अटक केली नसल्याची माहिती उपनगर पोलिसांनी दिली आहे़ या प्रकरणी विनोद सीताराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जेलरोड येथील योगेश्वर अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या मेव्हणीचा ९ नंबरचा फ्लॅट आहे़ पवार यांच्याशी तोंडओळख असलेल्या भारती अहिरे व तिची मुलगी कृतिका अहिरे (रा़ जयभवानीरोड, नाशिकरोड) यांनी सध्या राहण्याची व्यवस्था नसल्याचे कारण सांगून पवार यांच्याकडे आठ दिवसांसाठी फ्लॅट मागितला़ त्यानुसार पवार यांनी मेव्हणीला विचारून भारती अहिरे हिला फ्लॅट दिला़ त्यानंतर आठ दिवसांनी अहिरे हीस फ्लॅट खाली करण्यास सांगितले असता त्यांच्या मेव्हणीसोबत फ्लॅटचे साठेखत झाल्याचे सांगून फ्लॅट खाली करण्यास नकार दिला़ यानंतर पवार यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दाद मागितली; मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली़ शेवटी त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली तसेच संबंधित साठेखत बनावट असल्याचे पुरावेही दिले़ यानंतर उपनगर पोलिसांनी भारती व कृतिका अहिरे या दोघी मायलेकींविरुद्ध फसवणूक करणे, खोटा करारनामा तयार करणे असे गुन्हे दाखल केले आहेत़ मात्र, गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही़ (प्रतिनिधी)