पोलीस कुटुंबीय रस्त्यावर

By Admin | Updated: August 8, 2015 23:41 IST2015-08-08T23:35:09+5:302015-08-08T23:41:22+5:30

पाण्यासाठी ठिय्या : कल्याण निधीतून काम करण्याचे आश्वासन

Police Family Street | पोलीस कुटुंबीय रस्त्यावर

पोलीस कुटुंबीय रस्त्यावर

इंदिरानगर : धरणे, मोर्चा, निदर्शने, उपोषण अशा लोकशाही मार्गाने केली जाणारी आंदोलने व त्यातून कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांकडून केले जाणारे प्रयत्न पाहता मनपाच्या दुर्लक्षामुळे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनाच शनिवारी पाण्यासाठी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करावे लागले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्ग समांतर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याचे पाहून अखेर पोलीस कल्याण निधीतून नवीन पाइपलाइन टाकण्याचे ठरविण्यात आले.
वासननगर-पाथर्डी फाटा येथे पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांची वसाहत असून, जवळपास तीनशेहून अधिक कुटुंबे येथे राहतात. परंतु या वसाहतीला प्रारंभापासूनच पाण्याची तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असून, त्यासाठी वेळोवेळी पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी मनपाकडे तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून वसाहतीला पाण्याचा एक थेंबही मिळाला नसल्यामुळे शनिवारी पोलीस कुटुंबीयांच्या संतापाचा कडेलोट झाला व कोणतीही अनुमती न घेता सुमारे दोनशेहून अधिक पोलीस महिलांनी थेट मुंबई-आग्रा महामार्गावरील वाासननगरच्या समांतर रस्त्यावर धाव घेऊन हंडा, पाण्याच्या बादलीसह ठाण मांडले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनाने राणेनगरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली. या आंदोलनाचे वृत्त कळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सरदार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी ताफ्यासह धाव घेतली; परंतु आंदोलनकर्ते पोलीस कुटुंबीयच असल्याचे पाहून त्यांचाही नाइलाज झाला.
दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर आमदार सीमा हिरे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेऊन सोमवारी या प्रश्नी महापालिका आयुक्तांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु यापूर्वीही अशा प्रकारे आश्वासने देऊनही काहीच कार्यवाही न झाल्याची बाब आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिली. तर या आंदोलनाची पोलीस प्रशासनानेही दखल घेत महापालिकेकडून नवीन पाइपलाइन टाकण्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे ठरविले व वासननगरच्या समांतर रस्त्यावरून थेट पोलीस वसाहतीपर्यंत नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी पोलीस कल्याण निधीतून खर्च करण्याचे आश्वासन दिल्याने या महिलांनी आंदोलन मागे घेतले.

Web Title: Police Family Street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.