चित्रफीत काढणारा पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: July 3, 2016 22:26 IST2016-07-03T22:25:29+5:302016-07-03T22:26:05+5:30
सरदवाडी रोड : मेघा पावसे यांची सतर्कता

चित्रफीत काढणारा पोलिसांच्या ताब्यात
सिन्नर : येथील सरदवाडी रोड भागात भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलांची लपून-छपून मोबाइलमध्ये चित्रफीत काढणाऱ्या परप्रांतीय तरुणास सामाजिक कार्यकर्त्या व व्यावसायिक मेघा सोमनाथ पावसे यांच्या सतर्कतेमुळे नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
सिन्नर शहराची सर्वाधिक उपनगरे असलेल्या सरदवाडी रस्त्यालगत दररोज सायंकाळी बाजार भरत असतो. येथील त्रिमूर्ती चौकात पावसे यांचे सौभाग्य कलेक्शन हे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे.
काल सायंकाळी पावसे या दुकानात बसल्या असताना पुन्हा तोच तरुण भाजीपाला खरेदी करत असलेल्या महिलांची शूटिंग काढत असल्याचे त्यांनी पाहिले. त्या दुकानाबाहेर येताच तो तरुण पुन्हा पळून गेला. हा प्रकार लागलीच पावसे यांनी परिसरातील महिला व नागरिकांसह याचवेळी तेथे आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कानावर घातला. पोलिसांनीही पावसे यांना मोबाइल क्रमांक देऊन पुन्हा तो तरुण दिसल्यास कळविण्यास सांगितले. काही वेळाने पावसे या सरदवाडी रस्त्याने पुढे गेल्या असता सरस्वतीनगरजवळ तो तरुण महिलांची शूटिंग करत असल्याचे त्यांना दिसले. यावेळी सावध असलेल्या पावसे यांनी नागरिकांच्या मदतीने त्या तरुणास पकडले व भ्रमणध्वनीहून पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पुष्कर शंभुलाल नागदा (२६) याला ताब्यात घेतले. या तरुणाला धडा शिकवण्यासाठी मेघा पावसे यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)