वाहतूक नियम मोडणाऱ्या २७६ वाहनचालकांना पोलिसांचा दणका, आकारला दीड लाखांचा दंड
By नामदेव भोर | Updated: June 15, 2023 17:56 IST2023-06-15T17:55:58+5:302023-06-15T17:56:06+5:30
प्रामुख्याने दुचाकीवरून ट्रीपल सीट फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले होते.

वाहतूक नियम मोडणाऱ्या २७६ वाहनचालकांना पोलिसांचा दणका, आकारला दीड लाखांचा दंड
नाशिक : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सर्व पोलिस ठाण्यांसह वाहतूक विभागातील अधिकारी आणि अंमलदारांना आदेशित करताच पोलिसांनी शहरात धडक मोहीम राबवून तब्बल ६०२ वाहनांची झाडाझडती घेत तब्बल २७६ वाहनधारकांना तब्बल १ लाख ४४ हजार ७५० रुपयांचा दंड आकारला आहे.
नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेतर्फे नाशिक शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर बुधवारी (दि. १४) कारवाई करण्यात आली. यात प्रामुख्याने दुचाकीवरून ट्रीपल सीट फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले होते. त्याचप्रमाणे हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्या स्वारांवरही पोलिसांनी कारवाई केली. १५ पोलिस अधिकारी व ६८ पोलिस अंमलदारांनी संपूर्ण नाशिक शहरात नाकाबंदी करून ६०३ वाहनांची तपासणी केली.
यात परिमंडळ एक हद्दीत १२० वाहनांवर तर परिमंडळ दोन हद्दीत १५६ अशा एकूण २७६ वाहनधारकांवर कारवाई करून तब्बल १ लाख ४४ हजार ७५० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेतर्फे देण्यात आली.