अतिक्रमणे काढण्याबाबत महापालिकेला पोलिसांचे सहकार्य

By Admin | Updated: December 1, 2014 01:10 IST2014-12-01T01:10:25+5:302014-12-01T01:10:59+5:30

अतिक्रमणे काढण्याबाबत महापालिकेला पोलिसांचे सहकार्य

Police cooperate with municipality regarding removal of encroachment | अतिक्रमणे काढण्याबाबत महापालिकेला पोलिसांचे सहकार्य

अतिक्रमणे काढण्याबाबत महापालिकेला पोलिसांचे सहकार्य

नाशिक : शहरातील वाढती अतिक्रमणे हटविण्याबाबत महापालिकेतील सत्ताधारी मनसे आता कठोर भूमिका घेणार असल्याचे संके त आज मिळाले आहेत़ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अतिक्रमणे काढण्याबाबत महापालिकेला पोलिसांचे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे़ यामुळे राज ठाकरेंनी नाशिकचा दौरा आटोपून जाता जाता आगामी काळातील शहराच्या विकासासाठी महापालिकेच्या कठोर धोरणांची चुणूक आज दाखवून दिली आहे़ यामुळे राज ठाकरेंची वक्रदृष्टी आता अतिक्रमणांवर पडल्याची चर्चा आहे़
पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतानाच साडेअकराच्या सुमारास राज ठाकरे यांनी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह पोलीस आयुक्तांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली़ शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी साहाय्य मागण्याबरोबरच त्यांनी शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत आयुक्तांशी चर्चा केली़ शहरातील वाढती वाहतूक समस्या व पार्किंगच्या समस्येबाबत मार्ग काढण्यासाठी पोलीस व महापालिकेकडून संयुक्त नियोजन करण्याबाबत, तसेच शहरात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितता लाभावी याबाबत चर्चा केली़ महापालिकेच्या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेसाठी एक अधिकारी व १५ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून, महापालिकेची सूचना मिळताच ते उपलब्ध असतील, असे आयुक्तांनी ठाकरे यांना सांगितले आहे़
राज ठाकरे हे गेल्या तीन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असून, त्यांनी आज सकाळी मनसेचे पक्ष कार्यालय राजगड येथे नाशिक मध्य व पूर्व विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक व पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी प्रामुख्याने पक्षाची स्थिती, विकासासाठी भविष्यात काय करता येईल, पक्ष संघटना मजबुतीसाठी काय करता येईल असे विचारतानाच प्रत्यक्ष नागरिकांशी संपर्क कसा आहे, लोकांना वरच्या वर भेटून समस्या जाणून घेतात का, असे प्रश्नही विचारून प्रत्येकाच्या जनसंपर्काची चाचपणी केली़ यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विकासकामांचे प्रस्ताव अडकले आहेत, विकासकामांना निधीच नाही यांसह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबाबतही तक्रारी केल्याचे समजते.
यावेळी महापौर अशोक मुतर्डक, माजी आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले, नितीन भोसले, माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, डॉ. प्रदीप पवार, पुत्र अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, स्थायी सभापती राहुल ढिकले, सुजाता डेरे यांच्यासह मध्य तसेच पूर्व नाशिकमधील सर्व नगरसेवक उपस्थित होते. ठाकरे यांनी दुपारी एक वाजता नाशिक दौरा आटोपता घेत मुंबईकडे प्रस्थान केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Police cooperate with municipality regarding removal of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.