पेठरोड गोळीबारातील संशयितांना पोलीस कोठडी
By Admin | Updated: July 3, 2017 01:09 IST2017-07-03T01:09:18+5:302017-07-03T01:09:56+5:30
नाशिक : गोळीबार केल्यानंतर फरार झालेले तिघांना जगदंबा लॉजमधून ताब्यात घेतले़

पेठरोड गोळीबारातील संशयितांना पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीतील भरेकरी व्यवसाय करणारा संदीप लाड या तरुणावर हप्ता न दिल्याच्या कारणावरून गोळीबार केल्यानंतर फरार झालेले संशयित शेखर निकम, केतन निकम व विशाल भालेराव या तिघांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी औरंगाबाद शहरातील जालनारोडवर असलेल्या जगदंबा लॉजमधून ताब्यात घेतले़ या तिघांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़, तर यातील चौथा संशयित संदीप पगारे यास सोमवारी (दि़३) पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे़
पेठरोडवरील डॉ. बच्छाव हॉस्पिटलशेजारील हॉटेलमध्ये मित्रांसमवेत गुरुवारी (दि. २९) चहा पिण्यासाठी गेलेल्या फुलेनगर येथील संदीप अशोक लाड (२९) याच्यावर निकम बंधू, भालेराव व पगारे या संशयितांनी गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती़ या घटनेनंतर फरार झालेल्या तिघांच्या शोधासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदर आप्पा गवळी, भूषण रायते, सतीश वसावे, मोतीराम चव्हाण, सचिन म्हसदे, जितू जाधव, निंबाळकर, बस्ते यांनी औरंगाबाद येथील लॉजमधून या तिघांना अटक केली़
पोलिसांनी अटक केलेल्या या तिघांना न्यायालयात हजर केले असता गुन्ह्यातील पिस्तूल जप्त करणे, शस्त्रे जप्त करणे, त्यांचे इतर साथीदार व गुन्ह्यातील व्हेरिटो कार शोधणे याबरोबरच गुन्ह्यातील पिस्तूल कोणाकडून व कधी खरेदी केली याबाबत तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली़ या संशयितांवर पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणी, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी कलामन्वये गुन्हा दाखल आहे़