शहरातून पोलिसांचे संचलन
By Admin | Updated: September 7, 2016 00:45 IST2016-09-07T00:45:01+5:302016-09-07T00:45:13+5:30
शहरातून पोलिसांचे संचलन

शहरातून पोलिसांचे संचलन
नाशिक : गणेशोत्सव, बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांनी संचलन केले.
नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, अंबड, सातपूर, पंचवटी, सरकारवाडा आदि पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली वाढीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथकाचे जवान व गृहरक्षक दलाने परिसरात संचलन करत शक्तिप्रदर्शन केले.
पंचवटी : रामकुंड येथून सायंकाळी पावणे पाच वाजता पथ संचलनाला सुरुवात करण्यात आली. मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, सेवाकुंज मार्गे जुना आडगाव नाका, काट्या मारुती चौक, नागचौक, ढिकलेनगर, श्री काळाराम मंदिर, सरदार चौक, गंगाघाट परिसरातून काढण्यात येऊन रामकुंड येथे समारोप करण्यात आला. पंचवटी परिसरातील मुख्य चौकातून काढण्यात आलेल्या पोलिसांचा फौजफाटा बघून अनेक नागरिकांनी काय झाले हे बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. संचलनामध्ये पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, आडगाव पोलीस निरीक्षक संजय सानप, नम्रता देसाई, यांच्यासह अकरा पोलीस उपनिरीक्षक, १३१ पोलीस कर्मचारी, ३५ होमगार्ड, १३ महिला पोलीस, ११ चारचाकी वाहनांचा समावेश होता. परिमंडळ दोनमध्ये पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन करण्यात आले. (प्रतिनिधी)