सेना-भाजपाच्या प्रचाराने पोलीस सतर्क
By Admin | Updated: February 17, 2017 23:45 IST2017-02-17T23:45:04+5:302017-02-17T23:45:23+5:30
कायदा सुव्यवस्था धोक्यात : संवेदनशील प्रभागांवर लक्ष

सेना-भाजपाच्या प्रचाराने पोलीस सतर्क
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना व भाजपात एकमेकांच्या विरोधात केल्या जात असल्याच्या प्रचाराने राजकीय वातावरण गढूळ होण्याबरोबरच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची कटुता निर्माण होऊन त्याचा परिणाम मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा ठरू शकत असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणेने तयार केला असून, त्यादृष्टीने पोलीस बंदोबस्ताची आखणी केली जाणार आहे. विशेष करून ज्या प्रभागात सेना व भाजपाचे उमेदवार समोरा समोर ठाकले आहेत, त्यातही काट्याची लढत आहे अशा ठिकाणी संवेदनशील असल्याचे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. २६ जानेवारी रोजी शिवसेनेने भाजपाबरोबर युती तोडल्याची घोेषणा केल्यानंतर ज्या पद्धतीने भाजपाच्या विरोधात आक्रमकपणे प्रचार करण्यास सुरुवात केली आहे व त्याला त्याच प्रमाणात भाजपानेही उत्तर देण्याचा प्रयत्न चालविल्याची बाब सैनिकांना खटकू लागली आहे. विशेष करून भाजपाने थेट उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करून त्यांच्या मालमत्ता, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवून दुखती नस दाबल्याने शिवसैनिक खवळून उठला आहे. त्याचप्रमाणे सेनेनेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करून ‘औकात’ दाखवून देण्याची भाषा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. ठाकरेद्वयींप्रमाणेच रामदास कदम, संजय राऊत हेदेखील भाजपाला प्रत्येक विषयात आडवे हात घेत असून, सामना मुखपत्रात सातत्याने भाजपाविरोधात केले जात असल्याचे लिखाण भाजपाला बदनामीकारक वाटू लागले आहे. ’आडवे आल्यास आडवे पाडू’, गुंड-पुंडांच्या बळावर भाजपाची वाटचाल, गुंडाचे हात छाटू अशी धमकी देणारी भाषादेखील दोन्ही बाजूने कार्यकर्त्यांना उकसावित असल्याने त्याची कोणत्याही कारणाने ठिणगी पडू शकते, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा झाल्याने शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. त्यांच्याकडून ठाकरे यांच्या आरोपांना व टीकेला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही सभांच्या माध्यमातून आणखी राजकीय तणाव निर्माण होऊ शकतो, त्यातून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती अधिक आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या तीन-चार दिवसांत परिस्थितीवर लक्ष ठेवून ज्या ज्या प्रभागात सेना-भाजपा आमनेसामने आहेत अशा ठिकाणांवर अधिक लक्ष देण्याची गरज पोलीस यंत्रणेला वाटू लागली आहे. दरम्यान, शहरातील विविध मतदान केंद्र, संवेदनशील मतदान केंद्र, रस्त्यावरील बंदोबस्त यासाठी ४ हजार ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी तर उर्वरित कर्मचारी इतर कामासाठी वापरले जाणार आहे़ पोलीस प्रशासनाने संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची प्रभागनिहाय यादी तयार केली असून, त्याठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे़