पंचवटीत लसीकरण केंद्रावर पोलीस पाचारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:27+5:302021-07-04T04:11:27+5:30
शनिवारी लससाठा उपलब्ध झाल्याने पंचवटीत लसीकरण केंद्रावर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. काही केंद्रांवर नजर घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना टोकन ...

पंचवटीत लसीकरण केंद्रावर पोलीस पाचारण
शनिवारी लससाठा उपलब्ध झाल्याने पंचवटीत लसीकरण केंद्रावर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. काही केंद्रांवर नजर घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना टोकन देण्यात आले होते तर काही केंद्रांवर रांगेने येणाऱ्या नागरिकांना लस देण्याचे काम करण्यात आले. इंदिरा गांधी रुग्णालयात नंबर लावण्यावरून तसेच मायको रुग्णालयात नंबर लावूनदेखील लस मिळाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या वेळी प्रभागातील लोकप्रतिनिधींनी लसीकरण केंद्रावर जाऊन किती नागरिकांना लस दिली याची माहिती संबंधित रुग्णालयातून घेतली.
शनिवारचा दिवस असल्याने नागरिक शनिवारी लस घेतात व दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने आराम करतात. त्यामुळे शनिवारच्या दिवशी लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी झालेली होती. लस घेण्यापूर्वी नागरिकांना अँटिजन चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असले तरी शनिवारी मात्र शहरासह पंचवटीत काही केंद्रांवर चाचणी करण्यात आली नसल्याचे समजते. शासनाकडून १८ वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले असले तरी मात्र प्रत्यक्षात प्रत्येक केंद्रावर शंभर ते सव्वाशे लस उपलब्ध होत आहेत. तर लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या चारपट असल्याने हा गोंधळ उडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पंचवटीत असलेल्या लसीकरण केंद्रावर झालेल्या गोंधळानंतर काही काळ लसीकरण बंद करण्यात आले होते. गोंधळ मिटल्यानंतर लसीकरण पुरवठा केल्याचे संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मायको रुग्णालयात लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना रांगेत उभे राहूनदेखील यश मिळाले नसल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर प्रभागाचे नगरसेवक हेमंत शेट्टी, जगदीश पाटील, सरिता सोनवणे, शंकर हिरे, किरण सोनवणे यांनी तत्काळ लसीकरण केंद्रावर धाव घेत नागरिकांना लस दिली. याबाबत माहिती घेत नागरिकांना टोकन वाटप करून तसेच किती लस पुरवठा केला जातो याची माहिती नागरिकांना देण्याबाबत सूचना केल्या.