पोलिसांची नाकाबंदी ढेपाळली; अनावश्यक संचार वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:26+5:302021-05-05T04:24:26+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक संचारावर बंदी घालण्यात आली आहे. बाजारपेठाही बंद करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत किराणा माल ...

पोलिसांची नाकाबंदी ढेपाळली; अनावश्यक संचार वाढला
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक संचारावर बंदी घालण्यात आली आहे. बाजारपेठाही बंद करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत किराणा माल विक्री, भाजीपाला विक्री, दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शहरासह उपनगरांमध्येही या सकाळी रहदारी दिसते. मात्र, ११ वाजेनंतरही संध्याकाळी उशिरापर्यंत शहरात सर्वत्र नागरिकांची वर्दळ पाहावयास मिळत आहे. मागील महिन्यात ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेकडून नाकाबंदी आणि गस्त कडक करण्यात आली होती. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून याउलट चित्र बघावयास मिळत आहे. शहरात सर्रासपणे नागरिक इतक्या मोठ्या संख्येने घराबाहेर वाहने घेऊन पडत आहे, ती अत्यावश्यक कारणांसाठीच का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील काही ‘फिक्स पॉइंट’ला भेट दिली असता ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ अशीच स्थिती ‘लोकमत’ला आढळून आली.
---
वेळ : दु.१:०३ वा. ठिकाण: कॅनडा कॉर्नर - सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील या नाकाबंदीच्या ‘फिक्स पॉइंट’वर कोणीही आढळून आले नाही. शरणपूर रोड, तिबेटीयन मार्केटकडे या चौकातून जाणाऱ्या रस्त्यांवर केवळ बॅरिकेड उभे करून ठेवण्यात आले होते. तंबूत ना पोलीस होते, ना होमगार्ड. ‘एसपीओ’ही येथून गायब झालेले होते. नागरिकांची येथून सर्रासपणे ये-जा सुरू होती.
----
वेळ : दु.१:१५ वा. ठिकाण: जेहान सर्कल - गंगापूर पाेलीस ठाणे हद्दीतील भोसला सर्कलपासून जेहान सर्कलकडे जाणारा रस्ता बॅरिकेड टाकून बंद करण्यात आला आहे. जुन्या गंगापूर नाक्याकडून येणारी वाहतूक, तसेच आनंदवलीकडून येणारी वाहतूक या चौकातून सुरू आहे. चौकामध्ये पोलिसांनी बॅरिकेड टाकून नाकाबंदीचा देखावा उभा केला आहे. मात्र, नागरिकांची कुठल्याही प्रकारे कोणीही चौकशी या ठिकाणी करताना आढळून आले नाही. एक महिला व एक पुरुष पोलिसांची तंबूमध्ये हजेरी दिसून आली.
वेळ : दु.१:३५ वा. ठिकाण : चांडक सर्कल- मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील चांडक सर्कलजवळील तिडके कॉलनी पोलीस चौकीजवळ मायको सर्कलकडून येणाऱ्या रस्त्यावर पोलिसांच्या नाकाबंदीचे ‘फिक्स पॉइंट’ उभारण्यात आले आहे. या ठिकाणीही वरील नाक्यांप्रमाणेच चित्र दिसले. तंबूमध्ये खुर्च्या, अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. येथे कोणीही पोलीस अथवा होमगार्ड किंवा एसपीओही नजरेस पडले नाही.
वेळ : दु: १:४५ वा. ठिकाण : मालेगाव स्टॅन्ड- पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील मालेगाव स्टॅन्डवरील पोलीस चौकीजवळ लावलेल्या फिक्स पॉइंटवरही यापेक्षा काही वेगळे चित्र नव्हते. तंबू रिकामा अन् बंदोबस्त गायब अशी येथील नाकाबंदीची अवस्था पाहावयास मिळाली.
---
फोटो डेस्कॅनवर सेव्ह आहेत.