चोरट्यांच्या उपद्रवाने पोलीसही जेरीस

By Admin | Updated: May 15, 2014 00:16 IST2014-05-15T00:16:01+5:302014-05-15T00:16:01+5:30

सिन्नर शहर व परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरूअसलेल्या भुरट्या चोर्‍यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे.

Police also jailed for the thieves | चोरट्यांच्या उपद्रवाने पोलीसही जेरीस

चोरट्यांच्या उपद्रवाने पोलीसही जेरीस

सुनील थोरात ल्ल सिन्नर शहर व परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरूअसलेल्या भुरट्या चोर्‍यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. त्यातील एकही चोरटा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. चोरट्यांच्या या उपद्रवामुळे नागरिक, व्यापार्‍यांसह पोलीसही जेरीस आले आहेत. सिन्नर शहर, उपनगरे व मुसळगाव या भागाला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. येथील नवापूल भागातील भैरवनाथ शॉपिंग सेंटर परिसरात पाच ठिकाणी मिळून विविध भागात सुमारे ५० ते ६० दुकाने फोडून चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे रात्रीला सरासरी दोन चोर्‍या या नित्याच्याच ठरलेल्या आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे कार्यभाग उरकत आहे. त्यामुळे सिन्नर चोरांचे शहर होऊ पाहत असल्याने ही बाब चिंताजनक असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे ठरू लागले आहे. ज्या दुकानात रोख रक्कम मिळाली नाही त्या दुकानांतून माल घेऊन पोबारा केला आहे. दिवसभर कष्ट करून थोड्याफार नफ्यातून उदरनिर्वाह करणार्‍या व्यापार्‍यांचे ‘तेलही गेले अन् तूपही गेले...’ अशी अवस्था झाली आहे. चोरी गेलेला माल परत मिळणे सोडाच; परंतु महिनाभरात एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागू शकला नाही हे विशेष. सातत्याने एकाच परिसरात चोर्‍या होत असल्याने ते भुरटे चोर असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सरदवाडी रस्त्यालगत असलेल्या दुकानांमधून तसेच बंद घराची कुलुपे तोडून चोरट्यांनी हात धुवून घेतला आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी पोलिसांच्या कमी संख्येवरही रात्रीच्या गस्तीचे नियोजन केले. रात्रीची गस्त सुरळीत असल्याने चोरट्यांवर पोलिसांचा वचक होता. अर्थातच चोर्‍यांचे प्रमाणही कमी झाले होते. मात्र गेल्या महिन्यापासून पोलिसांची गस्त सुरू असली तरीही पोलिसांचा धाक उरला नसल्याने चोरटे निर्ढावले आहेत. शहराची वाढती लोकसंख्या व झपाट्याने होणारा विस्तार यामुळे पोलिसांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे. दोन्ही औद्योगिक वसाहती, एक राष्ट्रीय महामार्ग, तीन महत्त्वाचे राज्य मार्ग व त्यावर होणारे अपघात, विविध कौटुंबिक, जमिनीचे वाद, हाणामार्‍या, चोर्‍या तसेच रस्त्याने जाणार्‍या व्हीआयपींचा बंदोबस्त, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लागणारे पोलीस बळ त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे विविध गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा शोध आदि कामांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. येथील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहेत. मात्र त्याकडे शासनाचे वरिष्ठ आधिकारी काणाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जाता आहे.

Web Title: Police also jailed for the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.