पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी काळात निघणाऱ्या मिरवणुकांचा पारंपरिक शाहीमार्ग काही ठिकाणी अरुंद आहे, तर प्रशासनाने तयार केलेल्या पर्यायी शाहीमार्गाचा स्वीकार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत साधू-महंतांनी घूमजाव करून पारंपरिक मार्गच कायम ठेवण्याचे जाहीर केल्यामुळे प्रशासन गोंधळात पडले आहे़ या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आज दोन्ही शाहीमार्गांची पाहणी केली़ मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास काट्यामारुती पोलीस चौकीपासून पाहणीस प्रारंभ केला़ पर्यायी शाहीमार्ग असलेल्या गणेशवाडी, आयुर्वेद, महाविद्यालयासमोरील रस्ता, त्यानंतर जुना शाहीमार्ग असलेला नागचौक, काळाराम मंदिर, सरदार चौक परिसर व त्यानंतर जुन्या परतीच्या मार्गाची पाहणी केली़ या शाहीमार्गात कोणत्या भागात उतार आहे, कोणते रस्ते अरुंद आहेत, रस्त्यातील घरे, विद्युततारांचे अडथळे, रस्त्यालगत असलेले विद्युत जनित्र याची पाहणी करताना करून रस्त्यालगत असलेल्या घरे व इमारतींची पाहणी करून मोजमाप केले़ तसेच कोणत्या मिळकती कोणाच्या आहेत, रिकामे-धोकेदायक घरे याबाबत माहिती घेतली़ या पाहणीनंतर पोलीस प्रशासन महापालिका प्रशासनाला अहवाल सादर करणार आहे़ या पाहणी दौऱ्यात पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ, पंकज डहाणे, पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर सय्यद, समरुद्दीन शेख, वसंत पांडव, हवालदार खालकर, तुपलोंढे आदिंसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते़ (वार्ताहर)
पोलीस प्रशासनाकडून दोन्ही शाहीमार्गांची पाहणी सिंहस्थ कुंभमेळा : मनपाला अहवाल सादर करणार
By admin | Updated: February 25, 2015 00:23 IST