गणपतीच्या गाळ्यांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:11+5:302021-09-04T04:19:11+5:30

नाशिक : अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागात डोंगरे वसतिगृहावर गणपती मूर्ती विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेल्या ...

Police action on Ganpati's cheeks | गणपतीच्या गाळ्यांवर पोलिसांची कारवाई

गणपतीच्या गाळ्यांवर पोलिसांची कारवाई

नाशिक : अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागात डोंगरे वसतिगृहावर गणपती मूर्ती विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेल्या गाळ्यावर सरकारवाडा पोलिसांनी शुक्रवारी (दि.३) कारवाई करीत मूर्ती विक्रेत्यांना गाळे बंद करण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे याठिकाणी शहरातून मूर्ती खरेदीसाठी आलेल्या भाविकांनाही पोलिसांनी मैदानाबाहेर काढल्याने मूर्ती विक्रेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कोरोना संकटामुळे गेल्यावर्षी गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा झाला; परंतु यावर्षी रुग्णांची संख्या घटल्याने भाविकांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे मूर्ती विक्रेत्यांनीही मोठी तयारी केली असून, गजाननाच्या विविध रूपांतील मूर्ती विक्रेत्यांनी भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. गणेशोत्सवाला अजून आठ दिवसांचा कालावधी असला तरी अनेक भाविक आतापासूनच आपल्या आवडत्या रूपातील गणरायांची मूर्ती नोंदवून ठेवतात. त्यामुळे ग्राहकांची मूर्ती खरेदीसाठी डोंगरे वसतिगृह मैदानावरील स्टॉलमध्ये गर्दी होत असताना पोलिसांनी या स्टॉलधारकांवर कारवाई करीत स्टॉल बंद करण्यास भाग पाडले, तसेच येथे जमलेल्या भाविकांनाही मैदानाबाहेर काढले. त्यामुळे भाविकांसह मूर्ती विक्रेत्यांनीही पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

विक्रेत्यांना शनिवारी, रविवारी

नुकसानीची भीती

यावर्षीच्या गणेशोत्सवापूर्वीचा अंतिम शनिवार, रविवार असल्याने या दोन दिवसांत ७० ते ८० टक्के मूर्ती बुक होण्याची शक्यता आहे; परंतु पोलिसांनी त्यापूर्वीच गाळे बंद करण्यास सांगितल्याने विक्रेत्यांसमोरील अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे विक्रेत्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. आता पुन्हा पोलिसांच्या कारवाईमुळे विक्रेते संकटात सापडले आहेत.

कोट-

गाळ्यांसाठी आयोजकांनी परवानगी घेतली आहे. २८ ऑगस्टपासून हे गाळे तयार करण्यात आले आहेत. १ सप्टेंबरपासून भाविकही मूर्ती खरेदीसाठी येत आहेत; परंतु पोलिसांकडून ऐनवेळी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घेण्यात आली नसल्याचे सांगत कारवाई करून गाळे बंद केले आहेत. त्यामुळे विक्रेते संकटात सापडले आहेत. पोलिसांनी तत्काळ प्रक्रिया पूर्ण करून परवानगी द्यावी, अशी विक्रेत्यांची विनंती आहे.

-जयेश खिरोडे, मूर्ती विक्रेता

Web Title: Police action on Ganpati's cheeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.