पोलीस @११ ‘ऑनरोड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:12 IST2021-01-02T04:12:35+5:302021-01-02T04:12:35+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात कोठेही रात्री अकरा वाजेनंतर कोणीही रस्त्यावर भटकू नये, अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येऊ नये. ...

पोलीस @११ ‘ऑनरोड’
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात कोठेही रात्री अकरा वाजेनंतर कोणीही रस्त्यावर भटकू नये, अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येऊ नये. त्याचप्रमाणे राहत्या इमारतींच्या आवारात अथवा टेरेसवर कोणीही संगीत पार्टी रंगवू नये, असा इशारा शहर पोलिसांकडून मंगळवारीच देण्यात आला होता. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या काही मिनिटांअगोदरच सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, केक शॉप पोलिसांकडून बंद करण्यात येत होते. पोलीस गस्ती पथकांची वाहने शहरात सायरन वाजवून गस्तीवर असल्याचे चित्र पहावयास मिळाले. उघड्यावर मोकळ्या भूखंडांच्या आवारात तसेच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बंद उद्यानांमध्ये मद्यपान करताना आढळून येणाऱ्यांवर तसेच हुल्लडबाजी आणि फटाके फोडणाऱ्यांविरुध्द पोलिसांनी कारवाई केली.
ग्रामीण पोलिसांच्या वतीने नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कानेटकर उद्यान, सावरगाव रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरला जाणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी रोखून पुन्हा माघारी पाठविले. यामुळे या भागात शुकशुकाट दिसून आला.