विरोधीपक्षनेतेपदी कविता कर्डक
By Admin | Updated: March 19, 2015 00:08 IST2015-03-19T00:08:32+5:302015-03-19T00:08:49+5:30
विरोधीपक्षनेतेपदी कविता कर्डक

विरोधीपक्षनेतेपदी कविता कर्डक
नाशिक : महापालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ट असताना महापौरांनी बुधवारच्या महासभेत राष्ट्रवादीच्या गटनेत्या प्रा. कविता कर्डक यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड करत शिवसेनेला धक्का दिला. मनसे-राष्ट्रवादीच्या या खेळीबाबत अंधारात असलेली शिवसेना व विरोधीपक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी महापौरांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी झालेल्या महासभेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांनी सादर केलेल्या पत्रानुसार, महापौर अशोक मुर्तडक यांनी राष्ट्रवादीच्या प्रा. कविता कर्डक यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे घोषित केले. संख्याबळानुसार राष्ट्रवादीला हे पद बहाल करण्यात येत असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. सत्ताधारी मनसेने विरोधीपक्षनेते सुधाकर बडगुजर यांना पायउतार करत शिवसेनेला धक्का दिला असून, येत्या २४ मार्चला होणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला खुश ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत राष्ट्रवादीचे २०, तर शिवसेनेचे १९ सदस्य आहेत. शिवसेनेसोबत निवडणूकपूर्व युती असलेल्या रिपाइंचे ३ सदस्य असल्याने सेनेने अडीच वर्षांपूर्वी २२ संख्याबळाच्या आधारावर विरोधीपक्षनेतेपद पटकाविले होते. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत मनसेने राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर पुन्हा सत्ता ताब्यात घेतली. आता स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी-मनसे आणि अपक्ष यांनी एकत्र येण्याचे ठरविले आहे. (प्रतिनिधी)