स्मार्ट रोडच्या तक्रारीला तब्बल दीड वर्षानंतर पीएमओचे उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:16+5:302021-02-05T05:42:16+5:30
नाशिक : सरकारी काम, सहा महिने थांब, असे म्हटले जाते. मात्र, केंद्र सरकारच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ...

स्मार्ट रोडच्या तक्रारीला तब्बल दीड वर्षानंतर पीएमओचे उत्तर
नाशिक : सरकारी काम, सहा महिने थांब, असे म्हटले जाते. मात्र, केंद्र सरकारच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील डिजिटल इंडिया म्हणजे वेगाने कामकाज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा नाशिकचे पारस लोहाडे यांना भलताच अनुभव आला आहे. मोदी यांच्या संकल्पनेतील स्मार्ट सिटी करताना नाशिकचा अत्यंत गाजलेल्या स्मार्ट रोडचे काम दीड वर्षापासून रखडले आहे अशी तक्रार करणाऱ्या लोहाडे यांना पंतप्रधानांच्या तक्रार निवारण कक्षाने आणखी दीड वर्षाने उत्तर पाठवले आहे. त्यात काम संपले, स्मार्ट रोड सुरू झाल्याने तक्रार बंद इतकेच माफक कळविले आहे.
म्हणजेच अर्धवट रस्त्याची तक्रार केल्यानंतर ते पूर्ण होऊ दिल्यानंतर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने वेळ घेतला असेल तर अजब तुझे सरकार म्हणण्याचीच वेळ आली आहे, अशी भावना तक्रारकर्त्या लोहाडे यांनी व्यक्त केली आहे.
स्मार्ट सिटी हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून नाशिक शहराचा त्यात चार वर्षांपूर्वी समावेश झाला. या प्रकल्पाअंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान अवघ्या १ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी तब्बल १७ कोटी रुपये खर्च आला. त्यातही रस्त्याचे काम तब्बल तीन वर्षे चालले. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय आणि अन्य शासकीय कार्यालये, शाळा आणि बाजारपेठा असलेल्या या मार्गाचे काम रखडल्याने सर्वांचेच हाल झाले. सामाजिक कार्यकर्ते पारस लोहाडे यांचे अशोकस्तंभ येथे दुकान असून त्यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाल्याने त्यांनी त्रस्त होऊन अखेरीच पंतप्रधानांच्या तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केली होती. कामाच्या संथगतीमुळे चार वेळा मुदतवाढ दिलेल्या या मार्गाचे काम पूर्ण होत नसल्याने अखेरीस आपण पंतप्रधान म्हणून लक्ष घालावे अशी तक्रार त्यांनी केली होती. १ जुलै २०१९ रोजी त्यांनी पंतप्रधानांच्या पोर्टलवर ही तक्रार त्यांनी केली. त्यानंतर त्याचे काहीच उत्तर आले नाही. गेल्या वर्षी या रस्त्याचे काम पूर्ण झाले. दरम्यान, या ठेकेदाराला कंपनीने प्रति दिन ३६ हजार रुपये दंड केला. तो नंतर बंद केला. या दंडाला ठेकेदार कंपनीने लवाद नियुक्त करून आव्हानदेखील दिले. त्यानंतर आता गुरुवारी (दि.२८) पंतप्रधान कार्यालयाने प्रत्युत्तर पाठवले असून आता रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग तुमच्यासाठी खुला झाला आहे. एवढे उत्तर देऊन तक्रार निकाली काढली आहे. त्यामुळे लाेहाडे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
कोट...
मोदी सरकारने मला वाढदिवसाच्या दिवशी प्रत्युत्तर देऊन अनोखी भेट दिली आहे. किमान उत्तर देताना रस्त्याचे काम कसे काय पूर्ण झाले आणि कंपनीने ठेकेदारावर कारवाई केली हे तरी नमूद करायला हवे होते. रस्ता सुरू झाला हे दिल्लीहून पंतप्रधान कार्यालयाने कळवण्याची गरज नव्हती. डिजिटल इंडियाचा कारभार इतका वेगाने होत असेल तर काँग्रेसच्या काळातील कागदावरील व्यवहार काय वाईट होता?
- पारस लोहाडे, तक्रारकर्ते, नाशिक
...
स्मार्ट रोडचा संग्रहीत फोटो वापरावा.