विजेचा धक्का लागून प्लंबरचा मृत्यू
By Admin | Updated: September 7, 2016 00:52 IST2016-09-07T00:52:21+5:302016-09-07T00:52:35+5:30
धात्रक फाटा : मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार

विजेचा धक्का लागून प्लंबरचा मृत्यू
पंचवटी : आडगाव शिवारातील धात्रक फाटा परिसरात एका गृहप्रकल्पाच्या ठिकाणी प्लंबिंगचे काम करताना विजेचा धक्का लागल्याने आरिफ अब्दुल शेख (२५) राहणार संजयनगर (वाघाडी) या प्लंबरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजता ही घटना घडली. घटना घडल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने मोबाइल बंद करून घटनास्थळी येण्यास टाळाटाळ केल्याने मृत शेख याचे नातेवाईक व मित्रपरिवाराने बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत माहिती अशी की, धात्रक फाटा येथे दिलीप सैनी या बांधकाम व्यावसायिकाचे श्याम व्हिला नावाने असलेल्या रो-हाऊसचे बांधकाम सुरू आहे. आरिफ शेख व अस्लम बेग असे दोघे सैनी यांच्या साईटवर प्लंबिंगचे काम करतात. मंगळवारी प्लंबिंगचे काम सुरू असताना मशीन बंद झाल्याने बेग बघण्यासाठी गेला असता शेख जमिनीवर पडलेला दिसला. त्यावेळी शेखला उठविण्याचा प्रयत्न केला असता बेगलाही विजेचा झटका लागल्याने तो फेकला गेला. नंतर त्याने वीजप्रवाह खंडित करून शेखला रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
शेख याला वायरिंगचे काम येत नसताना सैनी यांनी त्याला सदर काम करायला लावले व त्यातूनच विजेचा धक्का बसला आणि शेखचा मृत्यू झाल्याचे त्याचा सहकारी बेग याने सांगितले. मयत शेख याचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह
झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई असा परिवार
आहे. (वार्ताहर)