खेळताना निरागस ‘साईश’वर काळाचा घाला
By Admin | Updated: January 11, 2017 00:15 IST2017-01-11T00:15:11+5:302017-01-11T00:15:28+5:30
दुर्दैवी घटना : काचेचा दरवाजा फुटून पोटाला गंभीर दुखापत

खेळताना निरागस ‘साईश’वर काळाचा घाला
पंचवटी : आयुष्य हे क्षणभंगूर व नाजूक असल्याचे बोलले जाते आणि कोणी कल्पनाही करू शकत नाही, असा एखादा दुर्दैवी प्रसंग घडतो अन् माणुसकीला हादरा बसतो. अशीच एक मन सुन्न करणारी घटना शहरात घडली. घरात खेळत असताना एक चिमुकल्याला पोटात काच लागून आपले प्राण गमवावे लागले.वेळ दुपारी तीन वाजेची. ठिकाण बळीनगरमधील सोपान संकुल येथील एका सदनिकेच्या बाल्कनीत चिमुकला साईश मनमुरादपणे खेळण्यात दंग होता. याचवेळी काळाने त्याच्यावर झडप घातली. साईश बाल्कनीच्या काचेच्या दरवाजावर आदळून गंभीर जखमी झाला. यावेळी तातडीने त्याच्या पालकांनी जवळच्या एका खासगी रुग्णालयात साईशला हलविले. काचेचा तुकडा पोटात घुसल्यामुळे श्वासनलिकेला गंभीर दुखापत झाल्याने चार वर्षीय साईशची उपचारादरम्यान मंगळवारी (दि.१०) सकाळी प्राणज्योत मालवली. या घटनेची आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.