मैदाने, खुल्या जागांची स्वच्छता
By Admin | Updated: February 6, 2016 23:37 IST2016-02-06T23:20:09+5:302016-02-06T23:37:09+5:30
स्वच्छ भारत अभियान : मनपाने राबविली मोहीम

मैदाने, खुल्या जागांची स्वच्छता
नाशिक : महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सामाजिक संस्था आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने शहरातील खेळांची मैदाने, शाळा-महाविद्यालयांचा परिसर तसेच खुल्या जागांवर स्वच्छता मोहीम राबविली. सकाळी ९ ते ११ या वेळेत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सामाजिक संस्थांच्या सदस्यांसह महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शहरातील सहाही विभागांतील खेळांची मैदाने, खुल्या जागा यावरील घाण-कचरा हटविण्याची मोहीम राबविली. त्यात प्रामुख्याने नाशिकरोड विभागातील मनपा शाळा, सिन्नर फाटा परिसर, पंचवटी विभागातील फनीबाबाचा दर्गा, गंगावाडी परिसर, रुंग्टा हायस्कूल, हनुमान घाट, घारपुरे घाट, सातपूर विभागातील स्वारबाबानगर, जिजामाता विद्यालय, शिवाजीनगर, गंगापूर गाव, आनंदवली परिसर तसेच नाशिक पूर्व विभागातील गांधीनगर, सुमन नाईक शाळा, नागझरी शाळा, अटलबिहारी वाजपेयी शाळा, रंगारवाडा शाळा, फुलेमार्केटजवळील उर्दू शाळा, वडाळारोडवरील मोकळा प्लॉट, बजरंगवाडी व्यायामशाळा, केबीएच विद्यालय, जनता हायस्कूल तसेच मानूररोड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
आता पुढच्या टप्प्यात दि. १३ फेबु्रवारीला शहरातील नद्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे व आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना
दिली. (प्रतिनिधी)