गडावर प्लॅस्टिकबंदी
By Admin | Updated: April 4, 2017 01:04 IST2017-04-04T01:04:39+5:302017-04-04T01:04:59+5:30
सप्तशृंगगड : सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गडावर प्लॅस्टिक आणू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी राधाकृष्णन बी़ यांनी केले आहे.

गडावर प्लॅस्टिकबंदी
सप्तशृंगगड : सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास रामनवमीपासून प्रारंभ होत असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गडावर प्लॅस्टिक आणू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी राधाकृष्णन बी़ यांनी केले आहे.
मंगळवार, दि. ४ रोजी सकाळी ७ वाजता ट्रस्टच्या कार्यालयापासून सप्तशृंगीमातेच्या महावस्त्र व अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिल्हा न्यायाधीश अरुण ढवळे याच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात येणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष यू. एम. नंदेश्वर, ट्रस्टचे विश्वस्त शिंदे, जायभावे, गायधनी, भिडे, राजेन्द्र सूर्यवंशी, ट्रस्टचे विश्वस्त तथा कळवणचे तहसीलदार कैलास चावडे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे या महापूजेसाठी उपस्थित राहणार आहेत.
यात्रा कालावधीत भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी २४ तास मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात ध्वनिक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्हीचे ६५ कॅमेरे लावण्यात आले आहेत.
नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, पहिल्या पायरीजवळ सहा मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. तेल अर्पण करण्यासाठीही पहिल्या पायरीजवळ व्यवस्था करण्यात आली आहे. नारळ वाढविण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भाविकांनी येताना बरोबर प्लॅस्टिक कॅरीबॅग न आणण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मंदिराच्या साफसफाई, रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. भगवती मंदिर, सभामडंप, जाणाऱ्या व उतरणाऱ्या पायऱ्या, भक्त निवास, भक्तांगण, शिवालय तलाव परिसर येथे पुरेशी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास रोहित्राची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र वीज कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. सप्तशृंगगड येथे ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी, सहायक कर्मचारी कार्यरत राहणार असून, औषधसाठ्यासह ठिकठिकाणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन यात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
भाविकांना नांदुरी येथून गडावर जाण्यासाठी परिवहन महामंडळातर्फे नेहमीप्रमाणे बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)