जादा बसेसचेही नियोजन

By Admin | Updated: October 24, 2016 00:27 IST2016-10-24T00:26:33+5:302016-10-24T00:27:02+5:30

प्रवाशांना भुर्दंड : ऐन दिवाळीत एसटीचा प्रवास महागला

Planning of buses too | जादा बसेसचेही नियोजन

जादा बसेसचेही नियोजन

नाशिक : दिवाळीचा सण आणि त्याला लागून येणाऱ्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात येणार असले तरी या कालावधीत प्रवाशांना मात्र नव्या दराने भाडे आकारणी केली आहे.
सणासुदीच्या काळात खासगी वाहतूकदारांकडून अवाच्या सव्वा तिकीट दर आकारून प्रवाशांची लूट केली जात असताना अनेक प्रवासी मात्र एसटीनेच प्रवास करण्यास प्राधान्य देतात. राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे तोटा झाला तरी चालेल, परंतु प्रवाशांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या मार्गावर बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार (दि. १४) नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत परिवर्तनशील भाडे वाढ करण्यात आली असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
दिवाळीसणातली गर्दी लक्षात घेता नाशिक - मुंबई, नाशिक - पुणे यांसह अन्य मार्गावर बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. वेगवेगळ्या आगारातून लांब पल्ल्यासाठी १८, तर धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर व्यतिरिक्त अन्य ठिकाणी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन १६ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
नाशिक जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांचा विचार करता सप्तशृंग गड, त्र्यंबकेश्वर, शिर्डी यांसह अन्य काही धार्मिक ठिकाणी तसेच पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. नाशिक - धुळे, नाशिक - शिर्डी या मार्गावर दर अर्ध्या-अर्ध्या तासाने बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बस स्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विभाग नियंत्रकांना जादा वाहतूक करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. भाडेवाढीबरोबर प्रवाशांना आवडेल तिथे प्रवास या योजनेचा आनंद घेता येणार आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर या सुविधा उपलब्ध असल्यातरी भाडेवाढीच्या तुलनेत हा प्रवास महाग ठरणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Planning of buses too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.