नाशिक : दोन दिवसांपूर्वीची गोष्ट...रात्री १० वाजेची वेळ... परिवहन महामंडळाची बस गाडी... पुण्यावरील ही बस द्वारकाला पोहचते... आणि धाड धाड, असे काचेवर दगड आदळतात...चालकाने बस जोरात हाकलली आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला. दगड कोणाला लागले नसले तरी द्वारका परिसरात रोजच, असे प्रकार घडत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.केवळ द्वारकाच नाही, तर शहराच्या झोपडपट्ट्यांच्या भागात असे अनेकदा घडते. चेहेडी, पेठरोड किंवा द्वारका अशा अनेक ठिकाणी परिवहन महामंडळाची किंवा खासगी प्रवासी बस ही जात असताना अचानक दगड फेकले जातात. मध्यंतरी पेठरोडवर खासगी बसवर अशाच प्रकारे दगडफेक झाल्याने एका प्रवाशाच्या तोंडाला दुखापत झाली होती. पुणे येथून येणाऱ्या निमआराम बसच्या बाबतीत असाच प्रकार घडला. रात्री १० वाजता ही बस द्वारका येथून येत असताना बसमध्ये पाच ते सहा प्रवासी होते आणि अचानक काच फोडून दगड आत पडला. बसमधील श्रृतकीर्ती तसेच केतकी भडकमकर यांनी फुटलेल्या खिडकीकडे बघत नाशिकमध्ये काय झाले दंगल वगैरे सुरू आहे काय, अशी शंका उपस्थित केली. तथापि, नाशिकमध्ये हे नेहमीच होते, असे बसचालकाने सांगितले.