पिंपरवाडी : साठवणीचे पाणी प्यावे लागत असल्याचा परिणाम
By Admin | Updated: March 21, 2015 00:01 IST2015-03-20T23:04:14+5:302015-03-21T00:01:05+5:30
दूषित पाण्यामुळे आजारांमध्ये वाढ

पिंपरवाडी : साठवणीचे पाणी प्यावे लागत असल्याचा परिणाम
सिन्नर : तालुक्यातील पिंपरवाडी (यशवंतनगर) येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांना साठवणीचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. सदर पाणी दूषित असल्याने गावात अनेक साथीचे आजार बळावल्याची तक्रार सरपंच कैलास काकड, ग्रामपंचायत सदस्य विजय गुरुळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
सलग तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने पिंपरवाडी (यशवंनगर) येथे पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्यासाठी गेल्या महिन्यातच प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्याप टॅँकर सुरू झालेला नाही. गेल्या आठवड्यापासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी साठवणुकीचे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळेच ग्रामस्थ आजारी पडत असल्याचा आरोप सरपंच काकड यांनी केला आहे.
गेल्या आठ दिवसापासून गावात काविळीची साथ सुरू झाल्याचे सरपंच काकड यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी व जुलाब आदि आजारही बळावल्याचे काकड यांचे म्हणणे आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रात तक्रार केल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावात येऊन पाहणी केली. गावातील पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. सदर साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी काकड यांनी केली आहे. (वार्ताहर)