पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा ग्रामीण भागातील वाढता प्रभाव रोखण्याकरीता शासन स्तरावर मोहिम राबविली जात असली तरी त्याला अनेक ठिकाणी ग्रामस्थांकडून पाहिजे असा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.पिंपळगाव बसवंत शहरात कोरोनाला रोखण्याकरीता कडक निर्बंध लागू करण्यात आले, मात्र याकडे ग्रामस्थ पूर्ण दूर्लक्ष्य करीत आहे. अशा परिस्थितीत नागरिक मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पडून गर्दीकरीत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या ठरवून दिलेल्या नियमांना देखील अक्षरशः पायदळी तुडवले जात आहे. यासाठी प्रशासनाने वेळीच अधिक कडक निर्बंध लादून या बेजबाबदार नागरिकांना थांबवणे गरजेचे आहे.वाढत चाललेल्या कोरोनाच्या महामारीला कसे थांबवायचे यासाठी प्रशासन रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. अनेक कर्मचारी त्यासाठी प्रयत्नकरीत आहेत. या संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू , संचारबंदी, दंडात्मक कारवाई, जागेवर रेपीड टेस्ट आदी अनेक निर्बंध देखील लादले जात मात्र याला नागरिक जुमानत नसून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे, त्यामुळे या बेजबाबदार नागरिकांना समज कशी द्यावी याचा मोठा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे.भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सुरू आहे. आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. पण ही लाट नेमकी कधी येणार, याचा प्रादुर्भाव किती काळ असेल, यातून कसे सरंक्षण करायचे याबाबत अद्याप काहीही सांगता येत नाही त्यामुळे सतर्कता व काळजी घेणे हेच सध्या गरजेचे बनले आहे.प्रशासन रात्रंदिवस कोरोनाच्या संसर्गजन्य रोगाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करावे व नियमांचे पालन करावे. मोठ्या संख्येने जर आपण गर्दी केल्याने कोरोनाच्या महामारीला आमंत्रण देत आहोत. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि आपले कुटुंब,आपला परिसर व आपले गाव आणि आपला देश सुरक्षित राहावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशिल असले पाहिजे.- गणेश बनकर, ग्रा.पं. सदस्य पिंपळगाव.
(०६ पिंपळगाव, १)