पिंपळगावी टोल कामगारांचे काळ्या फिती बांधून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:55 IST2021-03-31T23:06:48+5:302021-04-01T00:55:29+5:30
पिंपळगाव बसवंत : सरकारने टोलनाके बंद करण्याच्या केलेल्या घोषणेच्या निषेधार्थ पिंपळगावसह देशातील सर्वच टोल नाका कामगारांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला.

पिंपळगावी टोल कामगारांचे काळ्या फिती बांधून आंदोलन
पिंपळगाव बसवंत : सरकारने टोलनाके बंद करण्याच्या केलेल्या घोषणेच्या निषेधार्थ पिंपळगावसह देशातील सर्वच टोल नाका कामगारांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला.
शासनाची घोषणा टोल कामगारांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे सरकारने डिजिटल इंडिया जरूर करावे. मात्र, ते करत असताना बेरोजगार इंडियाचा पण विचार करावा. टोल नाक्यावर (जी. पी. एस.) धोरण अवलंबत असताना कुठल्याही प्रकारे टोल कर्मचारी बेरोजगार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, यासाठी टोल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून शासनाच्या टोल बंदच्या निर्णयाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटना सरचिटणीस अजय लोढा, कार्य अध्यक्ष रामेश्वर भावसार, सहसचिव सुधीर डांगळे, पिपळगाव उपअध्यक्ष तुषार साळवे, उपअध्यक्ष सुवर्णा बोरसे, उपअध्यक्ष मीनाक्षी गांगुर्डे, तसेच कर्मचारी रूबिना शहा, भाग्यश्री उघडे, प्रमिला चव्हाण, मुक्ता ठाकरे, कविता साबळे, रामनाथ गव्हाणे, राकेश चौधरी, भरत मांदळे, संपत कडाळे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाखो कामगारांची उपासमार
सरकार पुढील एका वर्षात देशातील सर्व टोल प्लाजा बंद करण्याच्या योजनेवर काम करीत आहे. टोल बंद करण्याचा अर्थ टोल प्लाजा बंद करण्याशी संबंधित आहे. सरकार अशा तांत्रिक गोष्टींवर काम करीत आहे. मात्र, यामुळे लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटनेच्यावतीने संपूर्ण भारतभर सरकारच्या निर्णयाविरोधात टोल नाक्यावर सर्व कामगार बांधवांनी शांततेत दिवसभर काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध नोंदविला व टोल बंदच्या निर्णयावर कडकडीत विरोध दर्शविला.
डिजिटल इंडिया जरूर करावा, त्याला आमचा विरोध नाही. मात्र, टोल कर्मचारी बेरोजगार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आमचे अर्धे आयुष्य टोल नाक्यावर काम करत गेले आहे. टोल नाकाच बंद झाला तर आमच्यावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळेल. त्यामुळे शासनाने आम्हा कर्मचाऱ्यांचा विचार करावा.
- भाग्यश्री उघडे, टोल कर्मचारी, पिंपळगाव बसवंत
शासनाच्या निर्णयानुसार टोल नाके संपुष्टात आले तर टोल नाक्यावर काम करणारे लाखो कामगार बेरोजगार होतील. शासनाचा डिजिटल इंडिया बेरोजगार इंडिया झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे टोल नाका बंदच्या निर्णयावर आम्ही काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला.
- सुवर्णा बोरसे, महाराष्ट्र टोल कामगार संघटना, उपाध्यक्ष