चिमुकल्या हातांनी उजळले प्रतिष्ठान
By Admin | Updated: October 21, 2015 22:32 IST2015-10-21T22:32:21+5:302015-10-21T22:32:58+5:30
चिमुकल्या हातांनी उजळले प्रतिष्ठान

चिमुकल्या हातांनी उजळले प्रतिष्ठान
नाशिक : स्वच्छतेतून समृद्धीकडे असा मूलमंत्र तेवत ठेवून येथील प्रबोधिनी विद्या मंदिर शाळेतील विशेष विद्यार्थ्यांनी त्र्यंबकरोड येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्वच्छता केली. शालेय जीवनापासूनच स्वच्छतेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रूजावा, तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यादृष्टीने गेल्या चार वर्षांपासून अविरत या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आलेले आहेत.
बुधवारी (दि.२१) कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे झालेल्या स्वच्छता अभियानात प्रबोधिनी विद्या मंदिर ट्रस्ट संचलित प्रबोधिनी विद्या मंदिर, सुनंदा केले संरक्षित कार्यशाळा, ट्रेनिंग सेंटर या विभागातील विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथील उद्यान, जलतरण तलावाजवळील वाहतूक बेट या परिसराची स्वच्छता केली. दरवर्षी मनपा प्रशासनातर्फे याठिकाणची साफसफाई करण्यासाठी पाण्याचा टँकर देण्यात येत होता; परंतु राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता यावर्षी टँकरऐवजी बादलीतून पाणी घेऊन स्वच्छता करण्यात आल्याचे अध्यक्ष रजनी लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
यावेळी सचिव डॉ. दिलीप भगत, मुख्याध्यापक रमेश वनिस, संगीता पाटील आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)