साहित्यातून घडते जीवनाचे दर्शन
By Admin | Updated: October 4, 2015 23:47 IST2015-10-04T23:46:37+5:302015-10-04T23:47:41+5:30
मिथिलाप्रसाद त्रिपाठी : हिंदी साहित्य पर्वणीतील परिसंवादात प्रतिपादन

साहित्यातून घडते जीवनाचे दर्शन
नाशिक : जीवन आणि साहित्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, वाचकांमुळे साहित्याला परिपूर्णता येते. वास्तव जीवनाचे दर्शन घडवणारेच खरे साहित्य असते, असे प्रतिपादन इंदूरच्या कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. मिथिलाप्रसाद त्रिपाठी यांनी केले.
साहित्य सरिता हिंदी मंच व अखिल भारतीय साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी साहित्य पर्वणी या कार्यक्रमात ‘साहित्य और जीवन’ विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. शंकराचार्य संकुलात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सी. पी. मिश्र होते. यावेळी डॉ. त्रिपाठी म्हणाले, माणसाला आलेले अनुभव दुसऱ्याच्या हितासाठी लिखित स्वरूपात व्यक्त करणे म्हणजे साहित्य होय. या साहित्याला वाचक, श्रोत्यांमुळे पूर्णत्व येते. ते नसतील तर साहित्याला अर्थच उरत नाही. भारतात साहित्याला प्राचीन परंपरा आहे. वेदांमध्ये काव्य दिसून येते. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश हे साहित्यच आहे. जीवनासाठी मार्गदर्शक तत्त्वे सांगणारे लिखाण साहित्यच असते. साहित्यातून कर्म, कृती करण्याची प्रेरणा मिळते. ते स्थिर मनाला चल बनवते.
बीएसएनएलचे महाप्रबंधक सुरेशबाबू प्रजापती यांनी सांगितले की, आपण तांत्रिक क्षेत्रात असल्याने त्यातच लिखाण केले व तेच आपल्यासाठी साहित्य आहे. उत्तम साहित्य जीवनाला प्रभावित करते, तर संदर्भहीन साहित्य दिशाहीन बनवते. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने साहित्याचा प्रसार होतो आहे. कोणी काय घ्यायचे, हे ज्याच्या-त्याच्या हातात आहे. चलार्थपत्र मुद्रणालयाचे महाप्रबंधक संदीप जैन यांनीही परिसंवादात सहभाग घेतला. ते म्हणाले, माणसाच्या चिंतनातून, सर्जनशीलतेतून साहित्य निर्माण होते. मनाच्या डोळ्यांनी पाहणाऱ्या हृदयापासून जे लिखाण करतात, त्यांचे साहित्य लोकोपयोगी असते. मन आणि हृदयाचा संबंध नसेल तर ते साहित्य वाचकांना भावत नाही. उदयपूर विश्वविद्यालयाच्या प्रा. डॉ. करुणा दशोडा यांनी सांगितले की, कल्पनाशक्ती असल्यास साहित्याची निर्मिती सोपी जाते; मात्र या निर्मितीचा सत्याशी संबंध असल्यास ती वाचकांना अधिक खोलवर भिडते. यतीशचंद्र मिश्र यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर साहित्य सरिताचा वार्षिक अंक ‘सृजन सरोवर’ व ‘अर्पण’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी साहित्य सरिता मंचाच्या अध्यक्ष डॉ. ज्योती गजभिये होत्या. वाराणसी येथील शंकराचार्य परमहंस परिव्राजकाचार्य ज्ञानानंद सरस्वती, प्रख्यात लेखिका डॉ. संतोष श्रीवास्तव, डॉ. राजम नटराजन पिल्लै, ‘सृजन सरोवर’च्या संपादक डॉ. रोचना भारती, ‘अर्पण’च्या संपादक सुनीता माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष सुबोधकुमार मिश्र यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चंद्रशेखर नागपुरे, शारदा गायकवाड, स्वप्नील कुलकर्णी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)