पेशवेकालीन १७ कुंडं गायब !
By Admin | Updated: February 28, 2017 23:07 IST2017-02-28T23:07:25+5:302017-02-28T23:07:42+5:30
नाशिक :गोदावरी नदीचे महत्त्वाचे नैसर्गिक जलस्त्रोत म्हणजेच पेशवेकालीन सतरा कुंडं विकासाच्या नावाखाली महापालिकेने गायब केल्याने नदीला भूगर्भातील हक्कचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.

पेशवेकालीन १७ कुंडं गायब !
अझहर शेख : नाशिक
दुसऱ्या क्रमांकाची व सर्वांत जास्त लांबीच्या गोदावरी या राष्ट्रीय नदीचा उगम त्र्यंबकेश्वरला झाला. नाशिकमार्गे ही नदी पुढे प्रवाहित झाली आहे. गोदावरीचे नैसर्गिक जलस्त्रोत अत्यंत उत्तम असून, बारमाही शुद्ध पाणी प्रवाहित ठेवण्याची क्षमता गोदामाईमध्ये आहे, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. मात्र दुर्दैवाने नदीचे महत्त्वाचे नैसर्गिक जलस्त्रोत म्हणजेच पेशवेकालीन सतरा कुंडं विकासाच्या नावाखाली महापालिकेने गायब केल्याने नदीला भूगर्भातील हक्क ाचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.
नाशिक शहराचे वैभव गोदावरी नदीमुळे टिकू न आहे. जगाच्या नकाशावर या नदीमुळे नाशिकला स्थान असले तरी येथील राज्यकर्त्यांना व प्रशासनाला मात्र गोदावरी संवर्धनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक वाटत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावलेली गोदावरी नाशिकहून १ हजार ४६५ किलोमीटरचा प्रवास करून आंध्र प्रदेशमधून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत बळकट असून, भूगर्भातील पाण्याच्या साठ्यावर गोदावरी बारमाही प्रवाहित राहू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे; मात्र त्याअगोदर त्र्यंबकेश्वरपासूनच गोदावरीचा मार्ग मोकळा करण्याची गरज आहे. कारण गोदावरीच्या तटावर कॉँक्रिटीकरण करून त्र्यंबकेश्वर परिसरात नदीची ९३ कुंडं बुजविण्यात आली आहेत. तसेच शहरात अहल्यादेवी होळकर पुलापासून पुढे तपोवनापर्यंत एकूण १७ प्राचीन कुंडं आहेत. या कुंडांमध्ये नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत जिवंत ठेवण्याचे काम त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी केले; मात्र दुर्दैवाने सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याचे महत्त्व समजले नाही. परिणामी कॉँक्रीट घाट नदीभोवती विकसित करून ही सर्व कुंडं त्या कॉँक्रीटआड करत नदीला धरणाच्या पाण्यावर अवलंबून ठेवले. पावसाळ्यानंतर नदीमधून गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहताना दिसते तसेच नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. एकलहरे औष्णिक केंद्रासाठी जेव्हा गंगापूर धरणातून विसर्ग केला जातो तेव्हा गोदावरीच्या पात्रातून शुद्ध पाणी प्रवाहित होताना दिसून येते. अन्यथा गोदावरीमधून केवळ सांडपाणी वाहते की काय? अशीच शंका अन्य शहरांमधून धार्मिक पर्यटनासाठी गोदाकाठी आलेल्या भाविकांना येते. मॅगसेसे पुरस्कार विजेते व जल आणि नद्यांचे अभ्यासक राजेंद्र सिंह यांनी वारंवार सर्वेक्षण करत गोदावरीमध्ये महापालिकेने ठिकठिकाणी सोडलेले सांडपाणी बंद करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत ‘रिव्हर’मधून ‘सिव्हर’ वेगळे केले जात नाही तोपर्यंत नदीचे प्रदूषण थांबणार नाही, असे सिंह यांनी वारंवार प्रशासनाच्या लक्षात आणून दिले आहे. गंगापूर धरणाच्या अस्तित्वाच्या अगोदर पासून स्वावलंबी स्वरूपात प्रवाहित असणारी गोदावरी नदी अ-प्रवाहित होऊन प्रदूषित बनली आणि गंगापूर धरणाच्या पाण्यावर परावलंबी झाली.