यशवंतराव चव्हाण साहित्याने व्यापलेले व्यक्तिमत्त्व : भावे
By Admin | Updated: October 23, 2016 00:17 IST2016-10-23T00:16:24+5:302016-10-23T00:17:02+5:30
सार्वजनिक वाचनालय : नूतन कोनशिलेचे अनावरण

यशवंतराव चव्हाण साहित्याने व्यापलेले व्यक्तिमत्त्व : भावे
नाशिक : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांचे जीवन म्हणजे साहित्य भरलेले व्यक्तिमत्त्व असून, त्यांचे संपूर्ण जीवनच साहित्याने व्यापलेले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले. यशवंतराव चव्हाण सात साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, तर पाच साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते. त्यांनी २० पुस्तके लिहिली; मात्र एकदाही ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले नसल्याची भावे यांनी खंत व्यक्त केली.
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या भिंतीवर नूतन कोनशिलेचे अनावरणप्रसंगी ‘यशवंतराव चव्हाण यांचे साहित्यिक योगदान’ विषयावर बोलताना ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास देशमुख, उपाध्यक्ष नरेश महाजन, प्रभारी कार्यवाह अॅड. अभिजित बगदे, देवदत्त जोशी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना भावे यांनी यशवंतराव चव्हाण यांनी ‘कृष्णाकाठ’, ‘युगांतर’, ‘सह्याद्रीचे वारे’ आदि पुस्तकांच्या माध्यमातून आत्तापर्यंत झालेल्या सर्व साहित्य संमेलन अध्यक्षांच्या तोडीची साहित्य निमिर्ती केली आहे; मात्र येथील साहित्य परंपरेतील सारस्वतांना एकदाही यशवंतराव चव्हाण यांना संमेलन अध्यक्षपदी बसविण्याची कल्पना सूचली नसल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात सहकार, औद्योगिक विकासासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण विकासालाही त्यांनी चालना दिली. त्यांनी सहकाऱ्यांसोबत विरोधकांनाही सन्मान दिला; मात्र त्यांची ही राजकीय आणि सामाजिक मूल्ये आजमितीला हरवली असून, आजच्या समाजाने सामाजिक आणि राजकीय नेतृत्व गमावले असल्याची टीका त्यांनी सध्याच्या राजकारण्यांवर केली. यावेळी औरंगाबादकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अॅड. अभिजित बगदे यांनी प्रास्ताविक तर, देवदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)