स्वत:ला जखमी करणाऱ्या ‘त्या’ रुग्णाचा अखेर मृत्यू
By Admin | Updated: March 20, 2016 23:44 IST2016-03-20T23:44:04+5:302016-03-20T23:44:17+5:30
स्वत:ला जखमी करणाऱ्या ‘त्या’ रुग्णाचा अखेर मृत्यू

स्वत:ला जखमी करणाऱ्या ‘त्या’ रुग्णाचा अखेर मृत्यू
नाशिक : व्यसनमुक्तीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या व संतुलन बिघडल्याने बेडला आग लावत, परिचारिकांना धक्काबुक्की करीत खिडकीच्या काचा स्वत:च्या पोटात खुपसून गंभीर जखमी झालेल्या इस्माइल समीर शेख (३५, रा़पंचशील नगर, गंजमाळ, नाशिक) या तरुणाचा रविवारी (दि़२०) सकाळी मृत्यू झाला़
दारूचे व्यसन असलेल्या इस्माइल शेखला व्यसनमुक्तीसाठी बुधवारी (दि़१६) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ पुरुष शल्य कक्षात ठेवण्यात आलेल्या शेखचे गुरुवारी (दि़१७) मध्यरात्री त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याने परिचारिकांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून गोंधळ घातला़ तसेच या वॉर्डातील चार बेड एकत्र करून त्यांना आग लावून दिली होती़ यामुळे या कक्षातील रुग्णांमध्ये भीती निर्माण झाली होती़
रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी शेखला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो तळमजल्यावर पळाला व तेथील खिडकीची काच फोडून ती स्वत:च्या पोटात मारून घेतली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेखला जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले, तर डॉक्टरांनी शस्त्रक्रियाही केली होती़ या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व डॉक्टर यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आंदोलन केले होते़ दरम्यान, पोटात काच मारून घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या शेखवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले़ या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)