व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा कायम
By Admin | Updated: July 16, 2016 00:30 IST2016-07-16T00:26:44+5:302016-07-16T00:30:23+5:30
सभापती बैठक : मंगळवारी पणनमंत्र्यांना भेटणार

व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा कायम
नाशिक : सहा दिवसांपासून सुरू असलेला संप कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील भाजीपाला व फळभाज्या आडते व व्यापाऱ्यांनी मागे घेतला असला तरी, कांदा, बटाटा संघटनेने संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कांदा व बटाट्याचे व्यवहार ठप्प होते.
दरम्यान, शुक्रवारी (दि.१५) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापतींची तातडीची बैठक होऊन त्यात येत्या मंगळवारी (दि.१९) सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन त्यांना बाजार समिती नियमन मुक्तीनंतरच्या येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा करणार आहे. बाजार समितीच्या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींनी कांदा व बटाटा व्यापाऱ्यांनी संप मागे घेण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते बाजार समितीच्या आत एक कायदा आणि बाजार समितीच्या बाहेर दुसरा कायदा, हा नियम व्यापारी व आडत्यांना मान्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास दीड हजार कांदा व बटाटेचे आडते व व्यापाऱ्यांनी त्यांचे परवाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे परत करून लिलावात सहभागी न होणार असल्याचे कळविले आहे, असे सभापतींनी स्पष्ट केले. त्यावर या कांदा व बटाटा व्यापाऱ्यांशी एक तातडीची बैठक बोलविण्याची चर्चा बैठकीत झाली. त्यानुसार येत्या रविवारी (दि.१७) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा व बटाटे व्यापारी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीस बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे, केदा अहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, जयदत्त होळकर, उषा शिंदे, जिल्हा बॅँक संचालक धनंजय पवार, प्रसाद हिरे, प्रवीण दराडे, तेज कवडे, दत्तात्रय पाटील यांच्यासह बहुतांश बाजार समितीचे सभापती उपस्थित होते. (प्रतिनिधी)