स्थायीची निवडणूक बिनविरोध
By Admin | Updated: June 11, 2014 00:19 IST2014-06-10T23:57:31+5:302014-06-11T00:19:13+5:30
उमेदवारांची नावे सादर करण्याची दक्षता दोन्ही पक्षांकडून घेण्यात आली.

स्थायीची निवडणूक बिनविरोध
नाशिक : महापालिका स्थायी समितीच्या सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी आज बोलावलेल्या विशेष महासभेत मनसेच्या चार, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तीन सदस्यांची निवड करण्यात आली. मनसे आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने पक्षांतर्गत गोंधळाची नामुष्की टाळण्यासाठी ऐनवेळी महासभेत आपापल्या उमेदवारांची नावे सादर करण्याची दक्षता दोन्ही पक्षांकडून घेण्यात आली.
महापौर अॅड. यतिन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत मनसेकडून अॅड. राहुल ढिकले, शीतल भामरे, दीपाली कुलकर्णी, अर्चना थोरात, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शोभा आवारे, रूपाली गावंड, राजेंद्र महाले यांची निवड करण्यात आली. स्थायी समिती सदस्यपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असला, तरी अधिकाधिक सदस्यांना स्थायी समिती सदस्यपदाचा लाभ मिळण्यासाठी या समितीत एक वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांचे राजीनामे मनसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने घेतले होते. मनसेचे विद्यमान सभापती रमेश धोंगडे, सुदाम कोंबडे, रेखा बेंडकुळे, सुमन ओहोळ व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे हरीश भडांगे, कल्पना चुंभळे, सुनीता निमसे या नगरसेवकांनी समितीच्या सदस्यपदाचे राजीनामे महापौरांकडे सादर केले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या सात जागांसाठी आजच्या महासभेत सदस्यांची निवड करण्यात आली.
महापालिकेची अर्थवाहिनी असलेल्या स्थायी समितीसाठी मनसे व राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती; मात्र पक्षातील कलहाची नामुष्की ओढावू नये यासाठी ऐनवेळी नावे घोषित करण्याची खबरदारी दोन्ही पक्षांकडून घेतली गेली. इच्छुकांची भाऊगर्दी असलेल्या या दोन्ही पक्षांतील चर्चेत असलेल्या काही नावांचाच ऐनवेळी पत्ता कापल्याने त्याचा येत्या काळात फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, निवड झालेल्या सर्व सदस्यांचा महापौर अॅड. यतिन वाघ यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृह नेते शशिकांत जाधव, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, प्रकाश लोंढे, कविता कर्डक, लक्ष्मण जायभावे, अशोक सातभाई आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)