पवारांनी ज्यांना स्पर्श केला त्याचा परिस झाला
By Admin | Updated: July 28, 2016 01:00 IST2016-07-28T00:03:02+5:302016-07-28T01:00:08+5:30
विलास माने : दोडामार्गात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, पक्षनिरीक्षकांकडून आढावा

पवारांनी ज्यांना स्पर्श केला त्याचा परिस झाला
दोडामार्ग : राष्ट्रवादी सर्वसामान्यांचा पक्ष असून धर्मनिरपेक्षता जोपासणारा पक्ष आहे. कोणत्याही पक्षात चढ-उतार असतातच, मात्र शरद पवारांनी ज्यांना-ज्यांना स्पर्श केला, त्याचा परिस झाला. जो सरपंच होणार नव्हता, अशांना आमदार केले आणि जो आमदार होणार नव्हता, त्यांना मंत्री केले. त्यामुळे संघटना मजबुतीसाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक विलास माने यांनी केले.
दोडामार्ग येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, कसई दोडामार्ग उपनगराध्यक्षा साक्षी कोरगावकर आदी उपस्थित होते. माने म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांना सोबत एकत्र घेऊन काम करणारा हा पक्ष असून, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाने त्याचे अस्तित्व संपूर्ण भारतात अधोरेखित झाले आहे. यामुळे किती आले आणि किती गेले, याचा हिशेब ठेवण्याची गरज नाही. ज्यांनी शरद पवारांना हाक दिली, त्यांना साहेबांनी नेताच केला आहे.
सेना-भाजपवाल्यांनी तर जनतेची दिशाभूलच केली आहे. ते बोलतात एक आणि करतात एक. खोटं बोलायचं पण ते रेटून बोलावे, अशी त्यांची पध्दत आहे. जनतेच्या हे आता लक्षात आले असून, आगामी काळ आपलाच आहे.
त्यामुळे तळागाळात संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन केले. सुरेश दळवी यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसाठी कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. (प्रतिनिधी)
दोडामार्ग येथे विलास राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश दळवी, व्हिक्टर डान्टस, प्रविण भोसले, कसई दोडामार्ग उपनगराध्यक्षा साक्षी कोरगावकर उपस्थित होत्या.