आता लोक फेसबुकच वाचतात!
By Admin | Updated: July 25, 2016 23:58 IST2016-07-25T23:57:30+5:302016-07-25T23:58:08+5:30
विष्णू खरे : व्यक्त केली खंत; वाचनाचा प्रवास उलगडला

आता लोक फेसबुकच वाचतात!
नाशिक : मी वाचनालयांची निर्मिती आहे. पुस्तकांमुळेच माझा आत्मविकास झाला. सध्या मात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावली जात नाही, हे दुर्दैवी असून, त्यामुळे आता लोक फक्त फेसबुक, ट्विटरच वाचतात. गंभीर साहित्य वाचले जात नाही, अशी खंत प्रख्यात ज्येष्ठ हिंदी कवी डॉ. विष्णू खरे यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त ते ‘मी आणि माझी वाचनालये’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले, मी पुस्तककिडा असून, सलग बारा-चौदा तासही वाचू शकतो. १९४६ पासून आतापर्यंत वीसवेळा संपूर्ण महाभारत वाचले आहे. माझे व्यक्तिमत्त्व व कर्तृत्व महाभारताने घडवले आहे. महाभारतासारखा ग्रंथ व कृष्णासारखे पात्र जगात कोठेच सापडणार नाही. आमच्या घरात ऊर्दू, फारसी पुस्तकेही असल्याने वयाच्या सहाव्या वर्षापासूनच ऊर्दूशी परिचय झाला. छिंदवाडा हे गाव लहान असले, तरी तेथे उत्तम वाचनालय होते. त्या वाचनालयाने माझे आयुष्य बदलवून टाकले. प्रेमचंदांच्या ‘गोदान’पासून पुरातत्त्वशास्त्रावरील पुस्तके तेथेच वाचली. पुढे खंडव्याला गेल्यानंतर तेथील वाचनालयातही परदेशी पुस्तके वाचायला मिळाली. गंभीर व लोकप्रिय साहित्य यातील फरक कळला. कवी मुक्तिबोधांपासून प्रेरणा मिळाली व लिखाण सुरू केले. या महिन्यात त्याला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. मी वीस वर्षांचा असताना पहिले पुस्तक प्रकाशित झाले. प्र. के. अत्रे, बाबूराव अर्नाळकर, अ. वा. वर्टी यांच्या कादंबऱ्या वाचल्या. पुढे प्राग, स्वीडन, मॉस्को असे जगभर फिरलो, तेथील वाचनालये पाहिली. आपल्याकडे वाचनालयांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतो. कोलकात्याचे राजाराम मोहन राय वाचनालय हे तर भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. तिथल्या नॅशनल लायब्ररीत पावसाचे पाणी जाऊन पुस्तकांचे नुकसान झाले. दिल्लीला जवाहरलाल मेमोरियल ट्रस्ट, दिल्ली पब्लिक लायब्ररी यांसारख्या काही चांगल्या संस्था आहेत. नाशिककर याबाबत नशीबवान असून, सार्वजनिक वाचनालय हीच खरी नॅशनल लायब्ररी असल्याचे गौरवोद्गारही खरे यांनी काढले. (प्रतिनिधी)