सुखी संसाराच्या आमिषाला भुलल्या गरिबा घरच्या लेकी
By Admin | Updated: June 2, 2016 23:33 IST2016-06-02T23:26:10+5:302016-06-02T23:33:09+5:30
सुखी संसाराच्या आमिषाला भुलल्या गरिबा घरच्या लेकी

सुखी संसाराच्या आमिषाला भुलल्या गरिबा घरच्या लेकी
संदीप झिरवाळ पंचवटी
मुलगा चांगल्या कंपनीत नोकरीला आहे, लग्नाचा खर्चही तेच करतील, तुम्ही मुलीला तयार करा, तुमच्या मुलीचा विवाह केला तर तिच्या आयुष्याचे कल्याणच होईल, अशाच काहीशा भुलथापांना अल्पवयीन मुलींचे माता-पिता भुलले आणि विवाहानंतर काही दिवसांतच संसाराची ताटातूट झाल्याने सुखी संसाराच्या आमिषाला बळी पडून गरिबा घरच्या लेकींची मोठी फसवणूक झाली.
नाशिकच्या अल्पवयीन मुलींची देहविक्री करण्यासाठी परराज्यात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला. नाशिक शहरात राहणाऱ्या व घरची परिस्थिती हलाखीची असणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या माता-पित्यांशी ओळख वाढवायची व त्यांच्या मुलीचा सुखी संसार करायचा असेल तर त्यांचा विवाह परराज्यात लावून देणारी टोळीच कार्यरत असल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले आहे. टोळीतील एजंटांनी अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री केल्याची माहिती पोलीस तपासात उजेडात आली आहे. अशाच प्रकारे फसगत झालेल्या दिंडोरीरोडवरील एका मुलीने राजस्थान येथून महिनाभरापूर्वीच पलायन करून सदरचा प्रकार आईकडे कथन केल्यानंतर त्यांनी धाव घेत झाल्याप्रकाराची पोलिसांसमोर वाच्यता केल्यानंतर झाला प्रकार ऐकून पोलीसही थक्क झाले आणि संशयिताना गजाआड केले. अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या आणखी दोघा युवतींची माहिती मिळाल्यावर त्यांनी चौकशी सुरू केली आहे.