प्रजा उदार, पण राजाचा नकार

By Admin | Updated: June 26, 2014 00:49 IST2014-06-26T00:32:51+5:302014-06-26T00:49:53+5:30

प्रजा उदार, पण राजाचा नकार

People are generous, but the king's denial | प्रजा उदार, पण राजाचा नकार

प्रजा उदार, पण राजाचा नकार

 

नाशिक : पर्यावरणाविषयी ओरड करणारे वृक्ष लागवडीत उत्साह दाखवित नाहीत, हा पालिकेचा नेहमीचाच मुद्दा खोडून काढून निमा या उद्योजकांच्या संस्थेने शहरात हवे तिथे झाडे लावून आर्थिक जर्जर झालेल्या पालिकेचे सव्वादोन कोटी रुपये वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु महापौरांनी बघू, करू असे सांगत कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने निमाचा उत्साह मावळण्याच्या बेतात आहे.
महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाच्या वतीने दरवर्षी लाखो झाडे लावल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात ते होते किंवा नाही हा संशोधनाचा विषय असताना आताही ठेकेदारांमार्फत शहराच्या सहाही प्रभागात झाडे लावण्यासाठी सव्वादोन कोटी रुपयांच्या निविदा महापालिकेने दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्रात जाहिरात देऊन मागविल्या होत्या. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. एलबीटीची अपेक्षित वसुली होत नसल्याने नागरी कामांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेला कर्ज काढण्याची वेळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर निमा या संस्थेने महापालिकेचे सव्वादोन कोटी रुपयांची बचत व्हावी, यासाठी महापालिका म्हणेल तेथे उद्योजक झाडे लावतील, अशी तयारी केली. निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, सरचिटणीस मंगेश पाटणकर, कर समितीचे अध्यक्ष मनोज पिंगळे, उद्योजक रवि वर्मा, व्हिनस वाणी यांनी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांची भेट घेऊन प्रस्ताव दिला; परंतु महापौरांकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही.
महापालिकेला झाडे लावावीच लागतात. ते बंधनकारक आहे. सध्या न्यायालयात वृक्षतोडीच्या विरोधात याचिका दाखल असल्याने महापालिकेला नियमानुसार अधिक संख्येने झाडे लावावी लागणार आहेत, असे महापौरांनी सांगितले. शिवाय सुरुवातीला दाखविला जाणार उत्साह नंतर राहत नाही, असे त्यांनी वाहतूक बेटाच्या विकासाच्या मुद्द्याने सांगितले.
तथापि, महापालिका सांगेल तितकी झाडे उद्योजक स्वखर्चाने लावतील, त्याबदल्यात नाव किंवा कोणताही मोबदला नको आहे, उलट झाडे लावण्याबाबत महापालिकेने उद्योजकांना करार करून द्यावा, असे उद्योजकांनी सांगूनही महापौरांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने उद्योजकांनी घरपट्टी भरावी, असा अन्य सल्लाही महापौरांनी यावेळी दिला.

Web Title: People are generous, but the king's denial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.