महापालिका रुग्णालयांतही पेन्टाव्हॅलंट लस मोफत
By Admin | Updated: December 1, 2015 23:52 IST2015-12-01T23:51:38+5:302015-12-01T23:52:58+5:30
शुभारंभ : आता सहा ऐवजी तीन इंजेक्शन

महापालिका रुग्णालयांतही पेन्टाव्हॅलंट लस मोफत
नाशिक : घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपॅटायटीस बी व हिमोफिलस, इन्फ्ल्युएन्झा बी या पाच आजारांपासून संरक्षण देणारी पेन्टाव्हॅलंट लस आता महापालिकेच्या रुग्णालयातही मोफत उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचा शुभारंभ महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात करण्यात आला. यापूर्वी लहान बालकांना डिपीटी लस व हिपॅटायटीस बी लस यांचे प्रत्येकी तीन इंजेक्शन, असे एकूण सहा इंजेक्शन देण्यात येत होते. मात्र, आता पेन्टाव्हॅलंट लसीचे तीनच इंजेक्शन देण्यात येणार आहेत.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सदर लस राज्यभर उपलब्ध करून देण्याचा शुभारंभ नुकताच केला. सदर लस ही खासगी दवाखान्यात १३०० ते १४०० रुपयांना उपलब्ध होते. मात्र, नाशिक महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यांमध्ये सदर लस मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात बालरोग तज्ज्ञ डॉ. स्नेहा वाघ यांनी सदर व्हॅक्सिनची माहिती दिली. या लसीचा लाभ घेण्याचे आवाहन महापौरांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर गुरुमित बग्गा, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, महिला व बालकल्याण सभापती वत्सला खैरे, पंचवटी प्रभाग सभापती सुनिता शिंदे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक विमल पाटील, अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड आदि उपस्थित
होते. सूत्रसंचालन इंदिरागांधी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश गरुड यांनी केले.