नगरसेवक निधीतील प्रस्ताव प्रलंबित
By Admin | Updated: November 9, 2015 22:50 IST2015-11-09T22:48:58+5:302015-11-09T22:50:42+5:30
नगरसेवक निधीतील प्रस्ताव प्रलंबित

नगरसेवक निधीतील प्रस्ताव प्रलंबित
नाशिक : नगरसेवक निधीतून करण्यात येणाऱ्या आणि मंजुरी मिळालेल्या विविध कामांचे प्रस्ताव आयुक्तांकडे स्वाक्षरीसाठी पडून असल्याने कामे मार्गी लागत नसल्याबद्दल स्थायी समितीच्या बैठकीत भडका उडाला. सदस्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी आयुक्तांशी ‘एसएमएस’च्या माध्यमातून संपर्क साधत येत्या दोन दिवसांत प्रलंबित फाईली मार्गी लागण्याचे आश्वासन दिले.
स्थायी समितीच्या बैठकीला प्रारंभ होण्यापूर्वीच रंजना भानसी व प्रा. कुणाल वाघ यांनी नगरसेवक निधीतील मंजूर झालेल्या कामांचे प्रस्ताव अद्याप आयुक्तांकडून स्वाक्षरी होऊन बाहेर पडले नसल्याची तक्रार केली.
आधी सिंहस्थ कुंभमेळा आणि आता स्मार्ट सिटीच्या नावाखाली प्रशासनाकडून फाईलींचा निपटरा करण्यात टाळाटाळ केली जात आहे. सद्यस्थितीत डेंग्यूच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले असताना भुयारी गटारीची कामे प्रलंबित आहेत. अनेक कामांच्या निविदा मंजूर आहेत; परंतु कार्यादेश निघत नसल्याच्याही तक्रारी सदस्यांनी मांडल्या. राहुल दिवे यांनी आयुक्तांच्या दालनात आपल्या प्रभागातील १५ फाईली पडून असल्याचे आणि त्या पुढे सरकत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सुलभ शौचालय, स्मशानभूमी, भुयारी गटार या कामांच्या सदर फाईली असल्याचेही दिवे यांनी सांगितले, तर नीलिमा आमले यांनीही रस्त्याच्या प्रलंबित कामाची माहिती दिली. शोभा फडोळ व यशवंत निकुळे यांनी पाणीपुरवठ्यासंबंधी पाइपलाइनची कामे मार्गी लावण्याची सूचना केली.
यावेळी अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी सिंहस्थात साधुग्राम-तपोवन परिसरात टाकण्यात आलेल्या पाइपलाइनमुळे मोठ्या प्रमाणावर पाईप महापालिकेकडे उपलब्ध असून, त्यासंदर्भात अंदाजपत्रकात तरतूद उपलब्ध झाल्यास त्वरित कामे
मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी नगरसेवक निधीतील कामांचा आढावा
घेऊन त्यांची सद्यस्थिती सदस्यांसमोर दोन दिवसांत ठेवण्याचे आश्वासन दिले, शिवाय बैठकीतून आयुक्तांशी ‘एसएमएस’च्या माध्यमातून संपर्क साधल्यानंतर दोन दिवसांत प्रस्ताव मार्गी लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)