माहिती दडवल्यास केबलचालकाला दंड

By Admin | Updated: August 18, 2015 00:10 IST2015-08-18T00:05:56+5:302015-08-18T00:10:41+5:30

शपथेवर प्रमाणपत्र : माहिती देण्यास सात दिवस मुदत

Penalties for cable operators | माहिती दडवल्यास केबलचालकाला दंड

माहिती दडवल्यास केबलचालकाला दंड

नाशिक : केबल व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक केबलचालकाने आपल्याकडील ग्राहकांची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करावी, त्याने दिलेल्या माहितीत तफावत आढळल्यास कमीत कमी ५० हजार रुपये दंडाची कार्यवाही करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
राज्य शासनाने जून महिन्यात केबलचालक व करमणूक कराबाबत धोरण ठरवून त्याला राजपत्रात प्रसिद्धी देण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रत्येक केबलचालकाने तसेच एमएसओ म्हणजेच मल्टी सिस्टीम आॅपरेटरर्स यांनी आपल्या ग्राहकांची अचूक माहिती शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर सादर करतानाच, त्यासाठी शासनाने घालून दिलेली शपथ घोषित करावयाची आहे. या संदर्भात दोनच दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व केबलचालकांची बैठक घेऊन शासनाच्या निर्णयाची माहिती दिली.
सध्या दर महिन्याला जिल्ह्यातील सर्व केबलचालकांची सोडत पद्धतीने चिठ्या टाकल्या जातात व ज्या केबलचालकाची चिठ्ठी निघेल त्याच्या सर्व केबल संख्येची तलाठ्यांमार्फत तपासणी केली जाते. केबलचालकाने दिलेली माहिती व प्रत्यक्षात आढळून आलेली जोडणीत तफावत आढळल्यास केबलचालकाकडून वाढीव जोडणीचा कर वसूल केला जात आहे. त्याच पद्धतीने आता केबलचालक शपथेवर सादर करणाऱ्या जोडणीच्या माहितीची खातरजमा करण्यात येणार आहे. येत्या सात दिवसांत ही माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Penalties for cable operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.