शांतता, संयम अन् शिस्तीचे प्रदर्शन

By Admin | Updated: September 24, 2016 23:00 IST2016-09-24T22:58:07+5:302016-09-24T23:00:13+5:30

मराठा क्रांती मोर्चा : ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद

Peace, patience and discipline | शांतता, संयम अन् शिस्तीचे प्रदर्शन

शांतता, संयम अन् शिस्तीचे प्रदर्शन


नाशिक : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यभर सकल मराठा समाजाच्या वतीने निघत असलेल्या मूक मोर्चातून घडत असलेल्या शांतता, संयम अन् शिस्तीचे प्रदर्शन नाशिकच्या मोर्चातही बघावयास मिळाले. त्यामुळेच सुमारे चार तास चाललेल्या या मोर्चात कुठेही अनुचित घटना घडली नाही. विशेषत: ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चा म्हटला की, मोर्चेकऱ्यांचा गोंगाट, घोषणांचा दणदणाट आणि रास्ता रोकोसह कधी हिंसक घटनांनाही वळण. परंतु सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्या मागण्या आणि वेदना अतिशय शांततेच्या मार्गाने आणि मूक स्वरूपात जनतेसमोर आणि सरकारपुढे मांडल्या जात आहेत.
नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी निघालेल्या मूक मोर्चातही शिस्तीचे आणि संयमाचे दर्शन घडविण्यात संयोजक यशस्वी झाले. गेल्या महिनाभरापासून नाशिकला काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी सुरू होती. गावोगावी बैठका घेऊन मराठा समाजाची भूमिका मांडली जात होती आणि मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात होते.
मोर्चात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक आदर्श आचारसंहिताच तयार करण्यात आली होती. मूक मोर्चात कुणीही घोषणा देऊ नयेत यापासून ते रस्त्यावर कचरा न टाकण्यापर्यंतच्या सूचनांचा समावेश होता. महिनाभरापासून केलेल्या तयारीचे फलित शनिवारच्या मोर्चातून पाहायला मिळाले. तपोवनात पहाटेपासूनच समाज बांधवांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. महिला व पुरुषांचे जथ्थेच्या जथ्थे तपोवनाकडे वाटचाल करताना दिसून येत होते. सुमारे १५ हजारांहून अधिक स्वयंसेवक गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. महिला व मुलींना जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली जात होती. रस्त्याने मार्गक्रमण करतानाही शिस्त आणि शांततेचे दर्शन घडविले जात होते. (प्रतिनिधी)
हॉटेल एसएसके केंद्रबिंदू
संपूर्ण मूक मोर्चाच्या तयारीचा केंद्रबिंदू मुंबई नाक्याजवळील हॉटेल एसएसके बनले होते. मराठा समाजाचे युवा नेते शैलेश कुटे यांच्या मालकीच्या या हॉटेलमध्येच गेल्या महिनाभरापासून समाजातील विविध स्तरातील नेते, मान्यवरांचा राबता होता. याठिकाणीच मोर्चाच्या कार्यक्रमाची रुपरेषा आखली गेली. सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मोर्चा यशस्वी करण्यासाठी संयोजक यशस्वी ठरले.

Web Title: Peace, patience and discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.