शांतता, निवडणुका सुरू आहेत !
By Admin | Updated: February 14, 2017 01:23 IST2017-02-14T01:22:56+5:302017-02-14T01:23:14+5:30
महापालिकेची नकारघंटा : नागरी कामांबाबतही टाळाटाळ

शांतता, निवडणुका सुरू आहेत !
नाशिक : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राबत असलेली यंत्रणा आणि सध्या लागू असलेली आदर्श आचारसंहिता यामुळे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. राजीव गांधी भवनात निरव शांतता असून, नागरी कामांसाठी नागरिक येत नाही आणि आले तरी त्यांचे काम होत नाही. अगदी आरोग्य विभागापासून सर्वच खात्यात गेल्यानंतर सध्या निवडणुकांची कामे आहेत, नंतर या असे सांगून बोळवणूक केली जात आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने अगोदरच कोणतेही काम होत नाही. त्यात आता बहुतांशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामांची जबाबदारी असल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या अन्य कामांवर झाला आहे. राजीव गांधी भवनात अधिकारी आणि कर्मचारी भेटत नाहीत, भेटले तर सध्या निवडणुकीची धावपळ सुरू आहे. पुढील महिन्यात या, असे सांगितले जात आहे. निवडणुकांमुळे मुळातच नगरसेवक किंवा अन्य राजकीय कार्यकर्ते महापालिकेकडे फिरकत नाहीत, परंतु पालिकेत नकारघंटा ऐकण्यास येत असल्याने नागरिकांचेही येणे कमी झाले आहे. त्यामुळे राजीव गांधी भवनात जेमतेमच वावर असतो.
नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
केवळ महापालिकेच्या मुख्यालयातच नव्हे तर सर्वच विभागीय कार्यालयांमध्ये अशीच अवस्था आहे. विभागीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कामे होत नाही. अस्वच्छतेपासून ते जन्ममृत्यू दाखल्याच्या कामासाठी गेलेल्या नागरिकांना पंधरा - वीस दिवसांनंतर या आता कर्मचारी निवडणूक कामासाठी गेले आहेत, असे सांगण्यात येत असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मनपाच्या वतीने तक्रार निवारणासाठी अॅप तयार करण्यात आले आहे. मात्र, त्याची दखल घेण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नाहीत अशी परिस्थिती आहे.