मुख्याध्यापकांना द्यावी केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी

By Admin | Updated: November 6, 2014 00:20 IST2014-11-05T23:56:01+5:302014-11-06T00:20:59+5:30

राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशनाची सांगता : दहा ठरावांना मंजुरी; पाठपुरावा करण्याचा निर्णय

Paycheck to Headmaster | मुख्याध्यापकांना द्यावी केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी

मुख्याध्यापकांना द्यावी केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी

नाशिक : केंद्रीय वेतनश्रेणीप्रमाणे राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीच्या ठरावासह तब्बल दहा ठरावांना मान्यता देत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या ५४ व्या राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशनाची सांगता करण्यात आली.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त दादासाहेब गायकवाड सभागृह येथे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यात निर्माण केलेले शिक्षण आयुक्तपद रद्द करावे, तसेच जिल्हापातळीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे माध्यमिक शाळांबाबतचे सर्व अधिकार रद्द करावे, ज्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे (विना अनुदानित) मूल्यांकन पूर्ण झालेले आहे व त्यामुळे अनुदानास पात्र ठरलेल्या सर्व शाळांना त्वरित अनुदान द्यावे, स्वयं अर्थसहायित शाळांना बृहत आराखड्याचा विचार करून मान्यता द्यावी, माध्यमिक शाळा संहितेनुसार शिक्षकेतर पदे मंजूर करावीत, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे खासगी शिक्षण संस्थांमधील सर्व कर्मचाऱ्यांनाही कुटुंब आरोग्य योजना लागू करावी आदिंसह विविध ठराव मांडून शासनाकडे पाठविण्यात आले. त्याचबरोबर हनुमंत कुबडे (पुणे), चिंतामणी तोरसकर (सिंधुदुर्ग), यू. डी. पाटील (जळगाव), अमृत पांढरे (सांगली) यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास अध्यक्ष सुभाष माने, अरुण थोरात, आमदार सुधीर तांबे, अ‍ॅड. नितीन ठाकरे, नाना महाले, मुरलीधर पाटील, नीलिमा पवार, बाळासाहेब पवार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Paycheck to Headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.