पवन ‘पावन’च राहणार!

By Admin | Updated: August 25, 2016 00:31 IST2016-08-25T00:30:43+5:302016-08-25T00:31:58+5:30

भाजपाने स्वीकारले : प्रदेशाध्यक्षांच्या संमतीनेच झाला प्रवेश

Pawan will remain 'Pavan'! | पवन ‘पावन’च राहणार!

पवन ‘पावन’च राहणार!

नाशिक : अनेक आरोपींचे धनी असलेले पवन पवार यांना भाजपाने पावन करून घेतले असून खुद्द प्रदेशाध्यक्ष आणि संघटनमंत्र्यांच्या संमतीने त्यांना प्रवेश देण्यात आल्याचे पक्षाचे मुखंड सांगत असल्याने आता पवारांची गच्छंती होण्याची शक्यता टळल्यात जमा आहे.
अनेक गंभीर आरोप असलेल्या अन्य पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांबरोबरच पवन पवार यांना भाजपाने आश्रय दिला असून शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप मनमानी करीत असल्याची तक्रार त्यांच्याच पक्षातून केली जात आहे. आपल्या आमदारकीला मदत करणाऱ्या पवन पवार यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी बाळासाहेब सानप यांनी असे धाडस केले आहे. त्यामुळे सानप यांच्यावर टीकेची झोड उमटत आहे. एका पोटनिवडणुकीसाठी भाजपा या थराला जाईल असे पक्षातील जुन्या जाणत्यांनाही कधी वाटले नव्हते, त्यामुळे त्यांनाही धक्का बसला आहे.
सानप माजी शहराध्यक्ष, आणि पक्षातून आलेल्या माजी आमदारांच्या चौकडीत बसून निर्णय घेत असल्याने त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी तर शहराध्यक्ष सानप हटवाचा नारा दिला आहे. त्यामुळे एका पवन पवारांसाठी सानप यांचे पद धोक्यात आले आहे. परंतु पवन पवार यांनी सोशल मीडियावरून आपल्याला कोणीही पक्षातून बाहेर काढू शकत नाही, असे पसरवून भाजपालाच आव्हान दिले असताना शहराध्यक्ष सानप हेदेखील मागे नाहीत. सानप हे आपण घेतलेला निर्णय हा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि संघटनमंत्री रवि भुसारी यांचे नाव पुढे करीत आहेत. त्यांच्या संमतीनेच हा प्रवेश सोहळा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षच राजी असेल तर पवार यांना पक्षातून कसे काढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पक्षातील निष्ठावांनाना काहीही वाटो आता प्रदेशाध्यक्ष आणि संघटनमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असेल तर विरोध करून काय उपयोग अशा प्रतिक्रिया भाजपातूनही उमटत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Pawan will remain 'Pavan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.