वस्त्रांतरगृह पाडाच, पोलीस करणार शिफार
By Admin | Updated: October 11, 2015 22:44 IST2015-10-11T22:40:10+5:302015-10-11T22:44:12+5:30
सकुंभमेळ्याचे दस्तावेज : धोकादायक इमारत असल्याचा दावा

वस्त्रांतरगृह पाडाच, पोलीस करणार शिफार
नाशिक : रामकुंडावर महापालिकेने बांधलेल्या आणि सध्या पुरोहित संघाच्या ताब्यात असलेल्या वस्त्रांतरगृहामागील शुक्लकाष्ठ दूर होण्याची चिन्हे नाहीत. कुंभमेळा पार पडल्यानंतर आता पुढील कुंभमेळ्यात ही इमारत धोकादायक ठरू शकते, त्यामुळे ती पाडण्याची शिफारस पोलीस आयुक्तालय आपल्या अहवालात करणार असल्याचे वृत्त आहे.
१९९०-९१ मध्ये झालेल्या म्हणजेच २४ वर्षांपूर्वी महापालिकेने रामकुंडावर कुंभमेळ्याच्या दरम्यानच वस्त्रांतरगृह बांधले. पर्वणीच्या दिवशीच नव्हे तर एरव्हीही याठिकाणी येणाऱ्या भाविकांना आणि विशेष करून महिलांसाठी हे वस्त्रांतरगृह उपयोगी पडेल, असे त्यावेळी प्रशासनाचे मत होते. सदरची इमारत पंचकोटी पुरोहित संघाच्या ताब्यात दिल्यानंतर या विषयात राजकारण घुसले आणि अनेकदा इमारत पाडावी किंवा महापालिकेच्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी होऊ शकली. यंदाच्या कुंभमेळ्यात तर हा विषय खूपच गाजला.
कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोजित एका बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वस्त्रांतरगृह पाडण्याचे आदेश दिले. कुंभमेळा तोंडावर असताना अचानक अशाप्रकारचे आदेश देण्यात आल्याने यंत्रणा बुचकळ्यात पडली. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी ही मागणी केल्याचे सांगण्यात आले. नंतर पालकमंत्र्यांनी आदेश फिरवत स्थानिक आमदारांनी पाहणी करून निर्णय घ्यावा, असे सांगितले. तर महंत ग्यानदास यांनी भाजपा आमदारांनीच आपल्याला ही मागणी करण्यास भाग पाडले, असे सांगून हात झटकले. त्यानंतर हा विषय मागे पडला आणि कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडला. परंतु आता पोलिसांनी आगामी कुंभमेळ्यासाठी जे दस्तावेज तयार करून ठेवण्याचे काम सुरू केले आहे, त्यात मात्र वस्त्रांतरगृह धोकादायक असून ते पाडावे, अशी शिफारस करण्यात येणार आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत येणार आहे.
यंदा पहिल्या पर्वणीला गर्दी नव्हती आणि दुसऱ्या पर्वणीला गर्दी वाढली. त्याचवेळी या इमारतीच्या बाजूने भाविक दुहेरी प्रवास करू लागल्याने गर्दी जमली. याठिकाणी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता दिसताच सीसीटीव्हीवरून नियंत्रण ठेवणाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना सूचना केली. त्यामुळे उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने तातडीने दोरखंड बॅरिकेडिंग करीत गर्दी नियंत्रणात आणली. त्यामुळे दुर्घटना टळली असली तरी वस्त्रांतरगृह बाजूने जा-ये करणे धोकादायक असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे, त्या आधारे पोलिसांनी ही शिफारस केली आहे. (प्रतिनिधी)
नियोजन चुकले पोलिसांचे : राग मात्र वस्त्रांतरगृहावर
कुंभमेळ्यात नागरिकांनी कोठून यावे आणि कोठून जावे याचे नियोजन पोलिसांनी केले होते. त्यामुळे यशापयशाची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. दुसऱ्या पर्वणीच्या वेळी वस्त्रांतरगृहाकडे झालेली गर्दी आणि चेंगराचेंगरीची उद््भवलेली स्थिती यामध्ये पोलिसांचे नियोजन चुकले. जर कोणत्याही मार्गावरून जाताना भाविक उलट दिशेने जाणार नाही, असे पोलिसांनी नियोजन केले होते, तर वस्त्रांतरगृहाजवळून भाजीपटांगणाकडे जाणारे आणि येणारे भाविक आमने-सामने कसे आले. गर्दी एकमेकांना भिडू लागल्याचे दिसू लागल्यानंतर जे वरिष्ठ पोलीस अधिकारी तेथे अवतीर्ण झाले ते काय करीत होते. भाविकांना उलटा प्रवास करण्यासाठी अगोदरच का रोखण्यात आले नाही, अशा अनेक शंका उपस्थित होत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून वस्त्रांतरगृहाची जी इमारत ‘जैसे थे’ आहे आणि तिच्या खालच्या पायऱ्यांवरदेखील चेंगराचेंगरी होऊ शकली नाही, त्या इमारतीवर राग काढण्याचाच हा प्रकार असल्याचे दिसत आहे.