पाटोदा सरपंच-ग्रामसेवकांनी केला अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:19 IST2017-07-18T00:10:52+5:302017-07-18T00:19:38+5:30
ग्रामपंचायत सदस्यांचे सीईओंना निवेदन

पाटोदा सरपंच-ग्रामसेवकांनी केला अपहार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पाटोदा ग्रामपंचायतीत सरपंचासह काही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संगनमताने अपहार करून धनादेशाची रक्कम स्वत:च्या नावे काढून भ्रष्टाचार केल्याची तक्रार पाटोदा ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांनी सोमवारी (दि.१७) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्याकडे केली.
ग्रामपंचायत सदस्य कौतिक वाघ यांनी स्वत: वाळूचा ट्रक ग्रामपंचायतीस दाखवून त्यांनी त्यांच्या नावे पैसे स्वीकारलेले आहेत. ग्रामविकास अधिकारी बी. एन. मोहिते यांनी अपहार करण्यास संबंधिताना मदत केल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह संबंधिताना पदावरून अपात्र ठरविण्याची मागणी ग्रामपंचायतीचे सदस्य साहेबराव बोराडे, दिलीप बोराडे, दिलीप बोरनारे, तुकाराम पिंपरकर, चंद्रकला नाईकवाडे, अश्विनी भुसारे, शमिना शेख यांच्यासह रतन बोरनारे यांनी केली आहे. निवेदनासोबत ग्रामपंचायतीचे खाते असलेले स्टेटमेंट, कॅशबुक, बॅँक स्टेटमेंट, रेशन कार्ड यांसह विविध पुरावे अर्जासोबत जोडले आहेत. सरपंच असलेल्या अनिता धनवटे यांनी त्यांच्याच दुकानातून ग्रामपंचायतीसाठी लाखो रुपयांचे साहित्य दिले. उपसरपंच सुलताना मुलानी यांनीदेखील पदाचा दुरुपयोग करून मुलगा रऊफ मुलानी यांच्या नावे ठेका घेऊन वाळू, दगड, मुरूम, खडी व पाण्याचे टॅँकर पुरवून ग्रामपंचायतीमध्ये पदाचा लाभ घेतला आहे.