पेस्ट कंट्रोल कर्मचारी मोदींना घालणार साकडे
By Admin | Updated: October 21, 2015 22:40 IST2015-10-21T22:36:30+5:302015-10-21T22:40:27+5:30
पेस्ट कंट्रोल कर्मचारी मोदींना घालणार साकडे

पेस्ट कंट्रोल कर्मचारी मोदींना घालणार साकडे
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला पूरक कार्य करणाऱ्या नाशिक महापालिकेकडील कंत्राटी २१२ पेस्ट कंट्रोल कामगारांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसून, ऐन सणासुदीत त्यांची उपासमार होत आहे. त्यांना किमान वेतनही मिळत नसून ठेकेदार आणि पालिका मात्र त्याबाबत उदासीन आहे, त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कैफियत मांडण्यासाठी हे कामगार दिल्ली येथे जाणार आहेत.
महापालिकेकडे कंत्राटी पद्धतीने काम करणारे हे सव्वादोनशे कामगार गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून काम करीत आहेत. शासनाने किमान वेतन कायद्यात सुधारणा केल्यानंतरही मासिक पाच हजार ३०० रुपयांवर काम करावे लागत आहे. ठेकेदार बदलला किंवा त्याने टाळाटाळ केली तर हे वेतनही दिले जात नाही. सध्या अशाच प्रकारे ठेकेदाराने टाळाटाळ केल्याने या कामगारांना विनावेतन राहावे लागले आहे. प्रत्येक कामगाराचे कुटुंब प्रपंच आहेत. कुटुंबात ज्येष्ठ व्यक्ती आहेत. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे; परंतु ही गंभीर परिस्थती असतानाही पालिका आणि ठेकेदार मात्र हेतुत: मूग गिळून असल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे. ठेकेदारी पद्धत नष्ट केली आणि या कामगारांना सेवेत घेऊन पेस्ट कंट्रोलचे काम केल्यास पालिकेचे चार ते पाच कोटी रुपये वाचतील, अशी महासभेत चर्चा होऊन त्यानुसार ठरावही झाला आहे. परंतु पालिका प्रशासन ठेकेदारावर मेहेरबान असल्याने ते ठेकेदारी पद्धत बदलण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आमचे ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, असा प्रश्न कामगार करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.