वहिवाट रस्ता होणार मोकळा
By Admin | Updated: August 23, 2016 00:02 IST2016-08-22T23:58:13+5:302016-08-23T00:02:50+5:30
पाटोदा दहेगाव शिवार : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

वहिवाट रस्ता होणार मोकळा
पाटोदा : येवला तालुक्यातील दहेगाव पाटोदा येथील जाधव वस्ती ते धनवटे वस्ती या रस्त्यावर अतिक्रमण करून वहिवाट रस्ता नांगरल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ईमारत व दळणवळण येवला उपविभाने तहसिलदारांसह संबंधित शेतकरी अशोक पवार यांना सदर रस्त्यावरील अतिक्रमण दूर करावे अशा आशयाचे पत्र दिले आहे. पत्रामुळे या मार्गावरून येजा करणाऱ्या शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जाधव वस्ती ते धनवटे वस्ती या रस्त्यावर अशोक पवार यांनी अतिक्रमण करून वहिवाट रस्ता नांगरल्याने शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ६ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेवुन संबंधित विभागाने सदरचे पत्र दिल्याने हे अतिक्रमण दूर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
येथील श्री रामचंद्र बंडू घोरपडे व ग्रामस्थ शेतकऱ्यांनी संबधित विभागाकडे तक्रार करून अतिक्रमण रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी केली होती. जिल्हा परिषदेच्या ईमारत व दळणवळण येवला उपविभागाने रस्त्याची समक्ष पाहणी केली असता अशोक पवार या शेतकऱ्याने आपल्या जमिनीलगतच्या दोन मीटर रुंदीत व लांबीत सुमारे साठ मीटर रस्ता नांगरून अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. रस्त्याची लांबी, रूंदी कमी करून रस्त्याची अलाईनमेंट बदलली असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या इमारत व दळणवळन विभागाने येवला तहसीलदारांनाही या संदर्भात १८ आॅगस्ट रोजी स्वतंत्र पत्र पाठवुन आपल्या स्तरावर सदरच्या रस्ता मोकळा करुन देण्यासंदर्भात संबंधितास समज देण्यात यावी असे असे सुचविले आहे. इवद विभागाचे उपअभियंत्यांची या पत्रावर स्वाक्षरी आहे. तहसीलदारांनी याबाबत त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी आता संबंधित शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, संबधित विभागाने पवार यांना लेखी व तोंडी सूचना देवूनही अद्यापपर्यंत अतिक्रमित रस्ता मोकळा न केल्याने या भागातील शेतकऱ्यांचे काढणीस आलेले टमाटा पिक रस्त्याअभावी शेतातच खराब होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. (वार्ताहर)