पक्षाने फटकारले : महापौरच मांडणार सत्ताधाऱ्यांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:20 IST2017-07-18T01:19:39+5:302017-07-18T01:20:00+5:30
पालिकेतील समांतर सत्ताकेंद्राला चाप

पक्षाने फटकारले : महापौरच मांडणार सत्ताधाऱ्यांची भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेत महापौरांना डावलत परस्पर निर्णय घेणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षनेत्यांनी फटकारले असून, समांतर सत्ताकेंद्राला चाप लावला आहे. यापुढे, महापौरच सत्ताधाऱ्यांची भूमिका मांडतील आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी ५ वाजता महापौर दालनात एकत्र बसून नागरिकांचे प्रश्न सोडवावेत, असे आदेश पक्षनेत्यांनी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
महापालिकेत भाजपाने पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत संपादन करत सत्ता हस्तगत केली. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद वेगवेगळ्या घटनांनी समोर आल्याने पक्षाची बदनामी होऊ लागली. महापौरांना डावलत काही पदाधिकाऱ्यांनी परस्पर बैठका घेण्याचा धडाका लावला. अधिकाऱ्यांना आपल्या कक्षात बोलावत त्यांना धमकावण्याच्याही चर्चा ऐकायला येऊ लागल्या.
मागील आठवड्यात महापालिकेच्या गाळेधारकांची परस्पर बैठक स्थायी समितीच्या सभागृहात बोलाविण्यात आली. या बैठकीला स्थायी समिती सभापती, सभागृहनेता व भाजपा गटनेता यांनी उपस्थिती लावली. मात्र, महापालिका मुख्यालयात उपस्थित असलेल्या महापौर रंजना भानसी या बैठकीविषयी पूर्ण अनभिज्ञ होत्या. परस्पर बैठक घेतल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती, तर भाजपा गटनेत्यांनी महापौरांच्याच आदेशान्वये सदर बैठक बोलाविल्याचे ठोकून दिले होते. या साऱ्या प्रकाराने भाजपातील पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद पुन्हा एकदा अधोरेखित झाला होता. त्याची गंभीर दखल पक्षनेत्यांनी घेतली असून, या प्रकाराबद्दल पदाधिकाऱ्यांना फटकारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
यापुढे, भाजपाचा महापालिकेतील कोणताही पदाधिकारी परस्पर सत्ताधारी पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडणार नाहीत. तसेच महापौरच याबाबत भूमिका स्पष्ट करतील. सर्व पदाधिकाऱ्यांनी रोज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महापौर कार्यालयात एकत्र येऊन नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावेत, गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचनाही संबंधिताना दिल्याचे समजते.पत्रकबाजीलाही लगामकाही उत्साही पदाधिकाऱ्यांनी पत्रकबाजी करत हस्तक्षेप सुरू केल्याने त्याचीही गंभीर दखल पक्षनेत्यांनी घेतल्याचे समजते. मध्यंतरी एका पदाधिकाऱ्याने आरोग्य विभागाला पत्र देत रात्रीच्या सफाईला विरोध केला होता तर महापौरांनी त्याचे समर्थन केले होते. याशिवाय, महापौरांनी नालेसफाईबाबत यू टर्न घेतल्यावरही संबंधित पदाधिकाऱ्याने प्रशासनाला पत्र देत नालेसफाईच्या चौकशीची मागणी केली होती. पक्षनेत्यांनी या पत्रकबहाद्दरांनाही वेसण घातली असून, त्याबाबत सज्जड दम दिल्याचे वृत्त आहे.