पक्षांचे शहराध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात
By Admin | Updated: February 17, 2017 23:42 IST2017-02-17T23:42:02+5:302017-02-17T23:42:21+5:30
उमेदवारीत अर्थकारण : वाद निवडणूक आयोगाकडे

पक्षांचे शहराध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक शहरातील बहुतांशी राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष वादात सापडले आहेत. यातील भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांच्यातील वाद तर निवडणूक आयोगाच्या पटलावर गेला असून, शिवसेनेतील प्रकरण तर हातघाईवर गेल्यामुळे काही पक्षांच्या शहराध्यक्षांच्या विरोधात वातावरण पेटले असून, निवडणुकीनंतर त्यांचे आणखी वेगळे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक होती. काही अन्य पक्षांतून आलेले तर काही अगदी तासाभरापूर्वी दाखल झालेल्या इच्छुकांना उमेदवारी मिळाल्याने हे दोन्ही पक्ष वादाच्या भोवऱ्यात सापडले. भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्यावर पक्षांतर्गत आरोप झाले, शिवाय निवडणुकीसाठी तिकीट विक्री झाल्याचे दोन कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपाला मोठा धक्का बसला. शिवाय यासंदर्भात निवडणुकीच्या आचारसंहिता कक्षाने दखल घेतली. त्यामुळे भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्याबरोबरच निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या ११९ उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा उमेदवारी वाटपावर वरचष्मा असल्याने साहजिकच ते वादात सापडले आहेत. शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनाही उमेदवारीप्रकरणी अनेक आरोपांना सामारे जावे लागले. माजी महापौर विनायक पांडे यांच्या चिरंजीवांना उमेदवारी नाकारल्याने तर पांडे यांनी बोरस्ते यांच्यावर अन्य उमेदवाराकडून लाखो रुपये घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केला. त्यानंतर बोरस्ते यांना मारहाण झाली. दुहेरी एबी फॉर्म वाटप, काहींना झेरॉक्स तर काही उमेदवारांना कोरे एबी फॉर्म दिल्याचे अनेक घोळ शिवसेनेत गाजले. कॉँग्रेसमध्ये अशाच प्रकारे शहराध्यक्ष शरद अहेर यांनादेखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले आहे. विशेष म्हणजे या पक्षाकडे उमेदवारांची वानवा आहे. परंतु काही मोजक्या प्रभागात उमेदवारीसाठी सारेच जण इरेला पेटले होते. त्यातून शहराध्यक्षांनी मनसे आणि अपक्षांशी युती केल्याच्या तक्रारी झाल्याच, परंतु कॉँग्रेस भवनाला टाळे ठोकण्यापर्यंत प्रकार घडले.